मुंबई : 'तिळगूळ घ्या, गोड गोड बोला' हा प्रेमळ संदेश देत नात्यात गोडवा निर्माण करणारा हा सण. समाजातील एकतेची आणि स्नेहाची भावना वृद्धिंगत करतो. यंदा मकरसंक्रांत बुधवार १४ जानेवारी २०२६ रोजी आहे. या निमित्ताने काही ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी भाषणाच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. अशा स्पर्धेत भाषण करण्यासाठी दहा महत्त्वाचे मुद्दे आणि या मुद्यांआधारे तयार केलेले भाषण.
मकरसंक्रांतीनिमित्त करायच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे
- मकर संक्रांतीचा दिवस आणि त्याचे महत्त्व.
- सूर्याचे मकर राशीत संक्रमण आणि उत्तरायणाची सुरुवात.
- खगोलशास्त्रीय बदल: दिवसाचा कालावधी वाढणे.
- तीळ आणि गूळ यांच्या सेवनाचे आरोग्यदायी फायदे.
- 'तिळगूळ घ्या, गोड गोड बोला' हा सामाजिक संदेश.
- शेती आणि नवीन पिकांचे आगमन: सुगड पूजन.
- पतंग उडवण्याची परंपरा आणि त्यातील आनंद.
- दानाचे महत्त्व आणि सण साजरा करण्याची पद्धत.
- निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.
- यशाची उंच भरारी घेण्याची प्रेरणा.
मकरसंक्रांतीचे भाषण
मकरसंक्रांत हा सण दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारीला येतो. यंदा हा सण बुधवार १४ जानेवारी २०२६ रोजी साजरा होत आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणूनच याला मकरसंक्रांत असे म्हणतात. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना तिचा अक्ष कललेला असतो, त्यामुळे मकरसंक्रांतीपासून उत्तर गोलार्धात सूर्याची किरणे अधिक काळ पडू लागतात. दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते.
संक्रांतीच्या काळात थंडीचा जोर असतो. या वातावरणात शरीराला उष्णता मिळावी यासाठी तीळ आणि गूळ हे दोन्ही उष्ण पदार्थ खाल्ले जातात. थंडीत तिळगूळ खाणे आरोग्यासाठी लाभाचे आहे. मकरसंक्रांतीला सगळे एकमेकांना तिळगूळ देतात. "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला" असे याप्रसंगी म्हणतात. सर्व जुने वाद, कटुता आणि राग विसरून आपण सर्वांशी प्रेमाने आणि गोडव्याने वागावे असा एक सामाजिक संदेश या निमित्ताने सर्वांना दिला जातो. जसे तीळ आणि गूळ यांच्या मिश्रणातून एक रुचकर पदार्थ तयार होतो त्याच पद्धतीने राग लोभ विसरुन आणि सुसंवाद साधत एकत्र राहिल्यास नात्यांचे बंध घट्ट राहतात.
मकरसंक्रांत हा सण कृषी क्षेत्राशी थेट जोडला आहे. शेतात नवीन धान्य आलेले असते, त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी शेतकरी सुगड पूजन करतात. आकाशात उडणारे रंगीबेरंगी पतंग आपल्याला उंच भरारी घेण्याची प्रेरणा देतात. पतंग जसा हवेच्या झोतासोबत झुलत झुलत वर जात असतो तसेच संकटांचा सामना करत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचले पाहिजे. आपल्याला मकरसंक्रांत हा सण निसर्गाशी कृतज्ञ राहण्याचा आणि मानवी नात्यातील गोडवा जपण्याचा संदेश देतो. मनातील नकारात्मकतेची संक्रांत करून विचारांमध्ये क्रांती घडवण्याची प्रेरणा देतो. सूर्याचे उत्तरायण प्रकाशाकडे वाटचाल करते, त्याचप्रमाणे आपणही अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि आळसाकडून कर्तृत्वाकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असाही एक सामाजिक संदेश देतो.
पतंग जसा मांजाचा आधार घेत स्थिर राहतो. कितीही उंच उडाला तरी नियंत्रणात असतो. अगदी तसेच आपली मूल्यं आणि मूळं यांना न विसरता प्रगती करत भरारी मारावी. पण या प्रगतीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहाय्यक असलेल्यांना विसरू नये, असा संदेश मतकरसंक्रांत हा सण देतो.






