कल्याण: कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ चे कामकाज पारदर्शक, सुरळीत आणि विहित वेळेत पार पाडण्यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांनी शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचारी तसेच शाळा व महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवा अधिग्रहित केली आहे. या अनुषंगाने पवार पब्लिक स्कूल, पलावा, डोंबिवली (पूर्व) येथील एकूण ८० कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजासाठी नियुक्ती आदेश बजावण्यात आले होते. संबंधित कर्मचाऱ्यांना वेळोवेळी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून निवडणूक कर्तव्यावर उपस्थित राहण्याचे निर्देशही देण्यात आले होते. मात्र, असे असूनही हे कर्मचारी निवडणूक कामकाजासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणास गैरहजर राहिले. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्याने महापालिकेचे सहायक आयुक्त संदीप रोकडे यांनी पवार पब्लिक स्कूल, पलावा, डोंबिवली (पूर्व) येथील ८० कर्मचाऱ्यांविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याची माहिती महापालिका उपायुक्त वंदना गुळवे यांनी दिली.
दरम्यान, १५ आणि १६ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी गैरहजर राहिल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाईचा इशारा गोयल यांनी दिला आहे. अनुपस्थितीमुळे निवडणूक व्यवस्थेवर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाने ही कारवाई हाती घेतली आहे. कर्तव्यावर हजर न राहिल्यास, लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही दिला आहे.