Monday, January 12, 2026

जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा ‘कोर्टा’च्या कचाट्यात

जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा ‘कोर्टा’च्या कचाट्यात

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे लक्ष

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता असतानाच, आता या प्रक्रिया पुन्हा एकदा कायदेशीर कचाट्यात सापडण्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा नव्याने याचिका दाखल झाली आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात याव्यात, अशी मागणी करणारी नवी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर महत्त्वाची सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषदांच्या बाबतीत पेच निर्माण झाला आहे. नगरपालिका, नगरपंचायती आणि नागपूर-चंद्रपूर महापालिकांच्या निवडणुका ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली असली तरी, न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून घेण्यास परवानगी मिळाली आहे.

जिल्हा परिषदांना जाचक अटी असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. जिल्हा परिषदांच्या बाबतीत केवळ ५० टक्के आरक्षणाची मर्यादा पाळणाऱ्या संस्थांच्याच निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.

फेब्रुवारीतील नियोजनावर टांगती तलवार

निवडणूक आयोगाने पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेण्याची तयारी पूर्ण केली होती. पुढील आठवड्यात याचा कार्यक्रम जाहीर होणार होता; परंतु आता सोमवारच्या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, यावर निवडणुका होणार की लांबणीवर पडणार हे स्पष्ट होईल.

Comments
Add Comment