आणि इच्छिलिया सांगडे आणि इच्छिलिया सांगडे | इंद्रिया आमिष न जोडे | ऐसा जो ठावे पडे | तोचि द्वेषु || ज्ञानेश्र्वरी : १३-२६
मनातल्या इच्छेप्रमाणे इंद्रियांना हवी असलेली बाब मिळाली नाही वा ती इतरांना प्राप्त झाली, तर जी मनोवृत्ती प्रकट होते, तिला द्वेष असे म्हणतात. मानवी आयुष्यातील षडरिपुंपैकी द्वेष हा एक रिपू आहे.
एका सुभाषितात वर्णन केल्याप्रमाणे भटजी, ज्योतिषी, वेश्या, कुत्रा, कोंबडा, भिकारी, अभिनेता आणि मंत्री हे एकमेकांचा द्वेष करतात. तसेच दोन स्त्रियांचेही एकमेकींशी पटत नाही. दोघी जर एकमेकींच्या सवती असतील तर दोघींमधला सवतीमत्सर पुराण काळापासून प्रसिद्ध आहे.
द्वेष वा मत्सर हा माणसाला काहीच फायदा करून देत नाही. उलट नुकसानच करतो. म्हणूनच 'कुणाही जीवाचा न घडो मत्सर' असे संत सांगतात. संतांच्या अतःकरणात भक्तिचे तरंग असतात. तिथे मत्सर नावाची भावना जराही आढळत नाही. संत ज्ञानेश्र्वर हणतात,
आपणचि विश्व जाहला । तरी भेदभावो सहजचि गेला । म्हणोनि द्वेष ठेला । जया पुरुषा । ज्ञानेश्र्वरी : १२-१९१
जो स्वतःच विश्वात्मक झाला तो कोणाचा द्वेष कसा करणार? द्वेषातून फक्त द्वेषच निर्माण होतो. म्हणून द्वेषाचे मूळ पूर्णपणे वेळीच संपविले पाहिजे, हा संतविचारांचा गाभा आहे.
पण संतांच्या वाटेवर अडचणी निर्माण करणे हा काही लोकांचा स्वभावधर्मच असतो. संत तुकारामांनी एका अभंगात म्हटल्याप्रमाणे हरिरण, मासा आणि संतसज्जन हे आपापल्या ठिकाणी असतात. हरिण गवत खाते, मासा पाण्यात क्रीडा करतो तर संत संज्जन आपल्या नामस्मरणात समाधानाने रहात असतात. पण पारधी हरणाची शिकार करतो. कोळी माशाला जाळ्यात पकडतो आणि दुष्टदुर्जन लोक सज्जनांशी विनाकारण वैर करुन त्यांना त्रास देतात.
खरं तर मत्सर करणारा स्वतःच आपले नुकसान करून घेतो. पण काजव्याने सूर्याचा मत्सर केला, तर सूर्याला काही फरक पडत नाही. काजव्याचीच वेळ, शक्ती आणि विचारशक्ती वाया जाते. टिटवीने समुद्राचा द्वेष केला तर समुद्राला काय फरक पडतो? पतंगाने दिव्याचा द्वेष केला तर दिव्याचे काय नुकसान? नुकसान पतंगाचेच आहे, मनात द्वेष भावना असेल तर मनाला शांती लाभत नाही. म्हणूनच संत सांगतात,की मत्सर, द्वेष या भावना मनातून काढून टाका. मग मनाला निरामय भक्तीचा अनुभव देईल.
- डॉ. देवीदास पोटे






