मुंबई : भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर यांनी दिलेले एक खास वचन अखेर पूर्ण झाले आहे. भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यास जेमिमा रॉड्रिग्जच्या गिटारच्या साथीने गाणे गाईन, असे प्रॉमिस 'लिटील मास्टर'नी दिले होते. या वचनाची पूर्तता करण्यासाठी हे दोन स्टार खेळाडू नुकतेच एकत्र आले आणि सोशल मीडियावर या अनोख्या जुगलबंदीने धुमाकूळ घातला आहे. या भेटीचे खास आकर्षण ठरली ती गावस्करांनी जेमिमाला दिलेली भेट. सुनील गावस्कर यांनी जेमिमाला 'बॅटच्या आकाराची' एक अतिशय सुंदर गिटार भेट दिली. जेव्हा जेमिमाने त्यांना या गिटारचे अनावरण करण्यास सांगितले, तेव्हा गावसकर मिश्किलपणे म्हणाले, "इथे मी सलामीचा फलंदाज नाही, तू आहेस!" हे ऐकून जेमिमासह तिथे उपस्थित असलेले सर्वच जण हसून उमलले. भेटवस्तू दिल्यानंतर लगेचच या दोघांची मैफल रंगली. 'शोले' चित्रपटातील अजरामर गाणे 'ये दोस्ती हम नहीं तोडेंगे' गावसकरांनी आपल्या आवाजात गायले, तर जेमिमाने आपल्या नवीन बॅटरूपी गिटारवर त्याला सुरेल साथ दिली. या मैफलीनंतर दोघांनीही या अनोख्या गिटारसह फोटोशूटही केले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वी एका मुलाखतीत गावसकर म्हणाले होते, "जर भारताने विश्वचषक जिंकला, तर जेमिमा आणि मी पुन्हा एकदा एकत्र गाणे गाऊ.






