Sunday, January 11, 2026

मेट्रो-९ मुळे अंधेरीतून थेट काशीगावपर्यंत प्रवास

मेट्रो-९ मुळे अंधेरीतून थेट काशीगावपर्यंत प्रवास

दहिसर ते भाईंदर टप्प्यातील सुरक्षा तपासणीला सुरुवात

मुंबई : दहिसर ते मिरारोड अंतर कमी करून या परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी १३.५ किमी लांबीच्या 'मेट्रो ९' मार्गिकेचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतले आहे. लवकरच ही मार्गिका सुरू होणार आहे. ही मार्गिका दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो- ७ मार्गिकेचा विस्तार आहे. मेट्रो-७ मार्गिकेच्या विस्तारामुळे मुंबईतील पश्चिम उपनगरे थेट मीरा- भाईंदर शहराशी जोडली जाणार आहेत. यामुळे अंधेरीतून थेट काशीगावपर्यंत प्रवास करता येणार आहे. या मार्गिकेत १० स्थानकांचा समावेश असून या मार्गिकेच्या बांधकामासाठी ६६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

'दहिसर ते भाईंदर मेट्रो ९' मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्प्यातील सुरक्षा तपासणीला मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) दिल्ली यांनी सुरुवात केली आहे. सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून मेट्रो संचलनाचा मार्ग मोकळा करण्यातील ही शेवटची आणि महत्त्वाची प्रक्रिया असून प्रक्रियेला सुरुवात झाल्याने आता लवकरच या टप्प्याला सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त होईल. तर सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल केला जाणार आहे. महानगरपालिकाांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असून आचारसंहिता संपल्यानंतर जानेवारीअखेरीस वा फेब्रुवारीच्या सुरुवातीला दहिसर ते काशीगाव मेट्रो धावण्याची शक्यता आहे. पूर्णत: उन्नत मेट्रो मार्गिका असलेल्या या मार्गिकेची कारशेड उत्तन येथील डोंगरी परिसरात असणार आहे. तर या मार्गिकेचे काम दोन टप्प्यांत केले जात आहे. दहिसर–काशीगाव आणि काशीगाव–डोंगरी असे हे दोन टप्पे असून सध्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर डिसेंबरअखेरीस हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या अनुषंगाने एमएमआरडीएने काही महिन्यांपूर्वी सीएमआरएस चाचण्यांना सुरुवात केली. मात्र सीएमआरएस चाचण्यांची प्रक्रिया पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त न झाल्याने डिसेंबरचा मुहूर्त चुकला. पण आता मात्र जानेवारीअखेरीस वा फेब्रुवारीच्या सुरुवातीला दहिसर–काशीगाव मेट्रो धावणार आहे. पहिल्या टप्प्यातील चाचण्या आता अंतिम टप्प्यात असून मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) दिल्ली हे मुंबईत दाखल झाले आहे. त्यांच्याकडून तपासणी सुरू आहे. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांत पहिल्या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. मात्र आचारसंहिता लागू असल्याने सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्याबरोबर मेट्रोचे संचलन करता येणार नाही. परिणामी, दहिसर–काशीगाव मेट्रो प्रवासासाठी प्रवाशांना काहीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Comments
Add Comment