हवा दक्षिण मुंबईची
सुहास शेलार
- कुर्ला पश्चिमेला असलेल्या 'एल' महापालिका कार्यालयाअंतर्गत कुर्ला, चांदीवली आणि साकीनाका परिसरातील प्रभाग येतात. सुमारे ९ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेला हा परिसर मुंबईतील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रभाग आहे. त्यातील सुमारे ७० टक्के झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी आणि मुस्लीम मतदारांचे लक्षणीय प्रमाण, ही या प्रभागाची ओळख आहे. मीठी नदीमुळे दर पावसाळ्यात होणारा पूर, औद्योगिक युनिट्समुळे निर्माण झालेले प्रदूषण, तसेच सांताक्रूझ–चेंबूर लिंक रोडवरील वाहतूक कोंडी हे येथील नागरिकांचे दैनंदिन प्रश्न आहेत. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा संथ वेग हा देखील असंतोषाचा मुद्दा ठरत आहे. २९ रस्ते पूर्ण झाले असले तरी तितकेच अपूर्ण आणि काही अजून सुरूच न झाल्याने स्थानिक नाराजी वाढलेली आहे. २०१७च्या पालिका निवडणुकीत शिवसेनेची येथे भक्कम पकड होती. मात्र शिवसेनेतील फुटीनंतर होणाऱ्या पहिल्या पालिका निवडणुकीत उबाठा आणि शिंदे गट यांच्यात थेट संघर्ष दिसत आहे. भाजप आणि महायुतीला काही भागांत पूरक वातावरण असले, तरी मुस्लीम मतदार निर्णायक ठरत असल्याने कोणताही प्रभाग सहज जिंकण्यासारखा नाही. प्रभाग १६० आणि १६६ मध्ये मागील निवडणुकीतील मताधिक्य हे फारच कमी होते. त्यामुळे यावेळी तुल्यबळ लढती अपेक्षित आहेत. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक १५८, १६४ आणि १७१ हे प्रभागही काटे की टक्कर होणार आहे. मुस्लीम मतदारांचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक असताना, मराठी मतदारांतील विभागणीमुळे प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार आहे.
- चांदिवली विधानसभेतील प्रभाग १५७ मधील माजी नगरसेविका आकांक्षा शेट्ये यांचा प्रभाग बदलून भाजपने त्यांना प्रभाग १५८ मधून रिंगणात उतरवले आहे. त्यांचा सामना उबाठाच्या माजी नगरसेविका चित्रा सांगळे यांच्याशी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा तुळसकर मैदानात असल्याने तिरंगी संघर्ष आहे. प्रभाग १६१ मध्ये शिवसेनेचे विजय शिंदे, उबाठाचे इर्शाद सय्यद आणि मोहम्मद इम्रान अब्दुल यांच्यातील सामना मुस्लीम मतांचे विभाजन कितपत होते, यावर निकाल अवलंबून राहील. प्रभाग १६३ मध्ये आमदार दिलीप लांडे यांच्या पत्नी शैला लांडे आणि उबाठाच्या संगीता सावंत यांच्यात थेट लढत असून, प्रभाग १७१ मध्ये शिवसेनेच्या सान्वी तांडेल विरुद्ध उबाठाच्या राणी येरुणकर यांचातील सामना लक्षवेधी ठरत आहे.
- वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या खार पूर्व आणि सांताक्रूझ पूर्व व्यापणाऱ्या एच-पूर्व प्रभागात बीकेसीसारखा उच्चभ्रू व्यावसायिक परिसर आणि मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या असा विरोधाभास दिसतो. वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, मीठी नदीचा पूर आणि प्रदूषण हे मुद्दे येथेही केंद्रस्थानी आहेत. सुमारे ५५ ते ६० टक्के झोपडपट्ट्या असल्याने उबाठा गटाचा प्रभाव काही भागांत जाणवतो. २०१७ मध्ये शिवसेनेने ९ जागा जिंकल्या होत्या, पण यावेळी प्रभाग ८७, ८२, ९० आणि ९२ मध्ये तुल्यबळ लढती दिसत आहेत. प्रभाग ८७ मध्ये उबाठाच्या पूजा महाडेश्वर, भाजपचे कृष्णा (महेश) पारकर, काँग्रेसचे प्रमोद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे संदीप उधारकर यांच्यातील चौरंगी सामना संपूर्ण प्रभागाचे लक्ष वेधून घेत आहे. येथील प्रभाग ९५ मधील लढत ही केवळ राजकीयच नव्हे, तर पक्षांतर्गत संघर्षामुळेही हायव्होल्टेज ठरली आहे. भाजपचे सुहास आडिवरेकर, राष्ट्रवादीचे अमित पाटील, उबाठाचे हरी शास्त्री, अपक्ष उबाठा बंडखोर शेखर वायगंणकर यांच्यात बहुरंगी लढत आहे.
- वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचा प्रभाव आहे, महायुतीमध्ये वांद्रे पश्चिम हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार हे येथून आमदार आहेत. यावेळच्या महापालिका निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात वांद्रे पश्चिममधील सर्वच्या सर्व प्रभागांत भाजप उमेदवार उभे करण्यात आले आहेत, ज्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा एकही उमेदवार या भागात नाही. भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, उबाठा आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी या भागात कंबर कसली आहे.
- कलिना मतदारसंघात उबाठाचे आमदार संजय पोतनीस असलेले तरी, या मतदारसंघातील विशेष म्हणजे प्रभाग क्र. ८९, ९१ आणि १६५ मध्ये चौरंगी किंवा तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे. कलिनासारख्या मराठीबहुल भागात उबाठा विरुद्ध शिवसेना या दोन्ही सेना आमनेसामने आहेत. भाजप उत्तर भारतीय मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी मनोज तिवारींसारख्या नेत्यांना प्रचारात उतरवत आहे, ज्याचा प्रभाव कलिनातील काही प्रभागांवर पडू शकतो. तिकीट वाटपामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरल्याने मुख्य पक्षांसमोर पेच निर्माण झाला आहे.
- चांदिवली मतदारसंघातील शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या पत्नी शैला लांडे प्रभाग क्रमांक १६३ मधून निवडणूक लढवित आहेत. काँग्रेसने त्यांच्या विरोधात स्थानिक प्रभावशाली व्यावसायिक कुटुंबातील सोनू जैन यांना उमेदवारी दिली आहे प्रभाग क्रमांक १६२ मध्ये माजी मंत्री आरिफ नसीम खान यांचे पुत्र अमीर खान निवडणूक रिंगणात आहेत. अमीर यांच्याविरोधात नसीम खान यांचे माजी सहकारी आणि माजी नगरसेवक वाजिद कुरेशी यांनी शिवसेनेकडून उमेदवारी घेतली आहे. एस. अण्णामलाई यांना उबाठाने उमेदवारी दिली आहे. प्रभाग क्रमांक १६१ मधून उबाठाने एका आयात उमेदवाराला संधी दिल्याने अंतर्गत नाराजी स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जाते. प्रभाग क्रमांक १६८ मधून अनुराधा पेडणेकर यांना भाजपने शेवटच्या क्षणी आपला उमेदवार बदलून अनुराधा पेडणेकर यांना संधी दिली आहे. त्या मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होत्या. पेडणेकर यांच्या विरोधात माजी नगरसेविका सईदा खान या राष्ट्रवादी (अजित पवार गट) लढवत आहेत.
- विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेच्या के-पूर्व आणि के-पश्चिम या प्रशासकीय विभागांमधील काही निवडणूक प्रभागांचा समावेश होतो. विलेपार्ले पूर्वचा भाग असलेल्या के-पूर्व प्रभागात व्यावसायिक आणि निवासी भागांचे मिश्रण आहे. वाहतूक कोंडी, हवा प्रदूषण आणि पाणीटंचाई हे येथील प्रमुख प्रश्न आहेत. २०१७ मध्ये सेना-भाजपचे वर्चस्व असले तरी यावेळी प्रभाग ७९, ८४ आणि ८६ मध्ये लढती क्लोज मानल्या जात आहेत. गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांचा मोठा पाठिंबा महायुतीकडे झुकलेला असल्याचे चित्र आहे. प्रभाग ८४ मध्ये भाजपच्या अंजली सामंत आणि मनसेच्या रूपाली दळवी यांच्यातील थेट सामना या भागात चर्चेचा विषय आहे.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा मुंबईतील सर्वाधिक गुंतागुंतीचा आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील भाग मानला जातो. एकाच मतदारसंघात झोपडपट्टी, मध्यमवर्गीय वसाहती, उच्चभ्रू टोलेजंग इमारती, मराठी, मुस्लीम-बहुल भाग, गुजराती-उत्तर भारतीय वस्त्या, अशी सरमिसळ दिसते. त्यामुळे पालिका निवडणुकीत येथे एकसुरी निकाल अपेक्षित न राहता, जवळपास प्रत्येक प्रभागात अटीतटीची लढत पाहायला मिळते. पाणी, रस्ते, ड्रेनेज, वाहतूक कोंडी, पूर नियंत्रण, प्रदूषण आणि झोपडपट्टी पुनर्वसन हे मुद्दे मतदानावर थेट परिणाम करणारे ठरत आहेत. या लोकसभा मतदारसंघात विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, कलिना असे विधानसभा मतदारसंघ येतात. उत्तर मध्य मुंबईत एकूणच महायुतीचा दबदबा जाणवतो, विशेषतः विलेपार्ले आणि वांद्रे पश्चिमसारख्या उच्चभ्रू भागांत कुर्ला आणि चांदिवलीत उबाठा गट मुस्लीम आणि झोपडपट्टी मतांवर अवलंबून आहे. काँग्रेस, मनसे आणि अपक्ष उमेदवारांमुळे अनेक प्रभागांत तिरंगी किंवा चौरंगी लढती होत असून, त्यामुळे निकाल शेवटच्या टप्प्यापर्यंत अनिश्चित राहण्याची शक्यता अधिक आहे.
प्रमुख लढती
प्रभाग क्रमांक १५१
- कशिश फुलवारिया - भाजप
- सानिया थोरात - उबाठा
- संगीता भालेराव - काँग्रेस
- वंदना सावळे - काँग्रेस
प्रभाग क्रमाक १६५
- अशरफ आझमी - काँग्रेस
- कॅप्टन मलिक - राष्ट्रवादी (अजित पवार गट)
- रुपेश नारायण पवार - भाजप
- अभिजीत कांबळे - उबाठा
प्रभाग क्रमांक – ९५
- भाजप - सुहास आडिवरेकर
- उबाठा - हरी शास्त्री
- अपक्ष - चंद्रशेखर वायंगणकर
- राष्ट्रवादी - अमित पाटील
प्रभाग क्रमांक ८७
- भाजप - कृष्णा (महेश) पारकर
- उबाठा - पूजा महाडेश्वर, भाजपचे,
- काँग्रेस - प्रमोद नार्वेकर
- राष्ट्रवादी काँग्रेस - संदीप उधारकर
प्रभाग क्रमांक – ८४
- अंजली सामंत – भाजप, रूपाली दळवी – मनसे
प्रभाग - १५८
- आकांक्षा शेट्ये - भाजप
- चित्रा सांगळे - उबाठा
- वर्षा तुळस्कर - राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग - १६१
- विजय शिंदे - शिवसेना
- इर्शाद सय्यद - उबाठा
- मोहम्मद इम्रान अब्दुल - काँग्रेस
प्रभाग - १६३
- शैला दिलीप लांडे - शिवसेना
- संगीता सावंत - उबाठा
प्रभाग - १७१
- सान्वी तांडेल - शिवसेना
- राणी येरुणकर - उबाठा






