बांगलादेशात हिंदूंना धमकी, जमात-ए-इस्लामीचा इशारा
ढाका : बांगलादेश निवडणुकांच्या दिशेने वाटचाल करत असताना देशात धार्मिक अल्पसंख्याकांवरील, विशेषतः हिंदू समाजावरील हिंसाचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर कट्टरपंथी संघटना जमात-ए-इस्लामीने मकर संक्रांती (स्थानिक भाषेत ‘शकरैन’) साजरी न करण्याचा इशारा दिला आहे.
जमात-ए-इस्लामीने सोशल मीडियावर आणि स्थानिक घोषणांद्वारे हिंदूंना धमकी देत, शकरैनच्या काळात संगीत वाजवणे, पतंग उडवणे किंवा कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केल्यास “कठोर परिणाम भोगावे लागतील,” असे स्पष्ट केले आहे. या इशाऱ्यामुळे ढाका, चितगाव, सिल्हेटसह अनेक हिंदूबहुल भागांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कुटुंबांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव हा सण घरातच किंवा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी १४ जानेवारी रोजी शकरैन मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र अलीकडच्या काळात काही कट्टर गटांनी या सणाला “गैर-इस्लामी” ठरवत विरोध सुरू केला आहे. गेल्या वर्षी ढाका व चितगावमध्ये उत्सव साजरा करणाऱ्यांवर हल्ल्यांच्या घटना घडल्या होत्या.
डिसेंबर २०२५ मध्ये विद्यार्थी नेता उस्मान हादी यांच्या हत्येनंतर परिस्थिती अधिकच चिघळली. त्यानंतर हिंदूंवर हल्ले, हत्या आणि लिंचिंगच्या घटना वाढल्या. बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिलनुसार, केवळ डिसेंबरमध्येच जातीय हिंसाचाराच्या किमान ५१ घटना नोंदल्या गेल्या आहेत. यामध्ये खून, जाळपोळ, दरोडे, खोट्या ईशनिंदेच्या आरोपांखाली अटक यांचा समावेश आहे. या वाढत्या हिंसाचारामुळे मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.






