Sunday, January 11, 2026

कॅनडाचा इमिग्रेशन यूटर्न

कॅनडाचा इमिग्रेशन यूटर्न

नव्या नियमांचा भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी अडथळा

नवी दिल्ली : कॅनडाने २०२६ साठी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी नवीन इमिग्रेशन (स्थलांतर) नियम लागू केले असून, त्याचा मोठा परिणाम भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांवर होणार आहे. तात्पुरत्या रहिवाशांची संख्या कमी करणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट असून, याच आनुषंगाने स्टडी परमिट, व्हिसा योजना आणि नागरिकत्व नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

२०२६-२०२८ इमिग्रेशन लेव्हल्स प्लॅननुसार, २०२६ मध्ये सुमारे ४ लाख ८ हजार स्टडी परमिट जारी करण्यात येणार आहेत. यामध्ये १ लाख ५५ हजार नवीन विद्यार्थी आणि २ लाख ५३ हजार विद्यमान विद्यार्थ्यांच्या मुदतवाढीचे अर्ज असतील. ही संख्या मागील वर्षांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी असल्याने भारतीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अधिक स्पर्धात्मक होण्याची शक्यता आहे. काही अहवालांनुसार भारतीय विद्यार्थ्यांचे स्टडी परमिट नाकारण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, मास्टर आणि डॉक्टरेट स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. १ जानेवारी २०२६ पासून पब्लिक डेसिग्नेटेड लर्निंग इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतलेल्या या विद्यार्थ्यांना प्रोव्हिन्शियल किंवा टेरिटोरियल अटेस्टेशन लेटर (PAL/TAL) सादर करण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे अर्ज प्रक्रिया सुलभ होणार असून आर्थिक ओझेही कमी होणार आहे.

कॅनडाने परदेशी उद्योजकांसाठी असलेला स्टार्ट-अप व्हिसा कार्यक्रम बंद केला आहे. ३१ डिसेंबर २०२५ नंतर नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. मात्र, २०२६ च्या अखेरीस उद्योजकांसाठी नवीन पायलट प्रोग्राम सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरोग्य क्षेत्रात मनुष्यबळाची गरज लक्षात घेता आंतरराष्ट्रीय डॉक्टरांसाठी स्वतंत्र एक्स्प्रेस एन्ट्री कॅटेगरी सुरू केली जाणार आहे. किमान एक वर्षाचा कॅनडातील अनुभव असलेल्या डॉक्टरांना कायमस्वरूपी वास्तव्याचा मार्ग खुला होणार आहे.

तसेच वरिष्ठ व्यवस्थापक, संशोधक आणि कुशल व्यावसायिकांसाठीही नवीन संधी निर्माण होत आहेत. भारतीय व्यवस्थापकांना कायमस्वरूपी निवास परवाना मिळण्याची शक्यता वाढली आहे.

दरम्यान, ‘होम केअर वर्कर इमिग्रेशन प्रोग्राम’ स्थगित करण्यात आला असून, मार्च २०२६ मध्येही तो पुन्हा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे या क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांना फटका बसला आहे.

नागरिकत्व कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणा अंतर्गत परदेशात जन्मलेल्या किंवा दत्तक घेतलेल्या कॅनेडियन नागरिकांना आता नागरिकत्व मिळणे अधिक सोपे होणार आहे. एकूणच, कॅनडाचे नवीन इमिग्रेशन नियम काही क्षेत्रांसाठी संधी निर्माण करणारे असले तरी, भारतीय विद्यार्थ्यांसाठी अधिक आव्हानात्मक ठरणार आहेत. त्यामुळे कॅनडात शिक्षण किंवा नोकरीसाठी जाण्याचे नियोजन करणाऱ्यांनी नवीन नियमांची सखोल माहिती घेणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment