Sunday, January 11, 2026

उद्धव - राजच्या शिवाजी पार्कमधील सभेआधीच उबाठाला मोठा धक्का

उद्धव - राजच्या शिवाजी पार्कमधील सभेआधीच उबाठाला मोठा धक्का

मुंबई : उद्धव आणि राज यांची रविवारी शिवाजी पार्क मैदानावर प्रचारसभा होणार आहे. ही सभा होण्याआधीच उबाठाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. लालबाग परळ शिवडी पट्ट्यातील प्रभावी नेते दगडू सकपाळ यांनी उबाठा सोडली असून रविवारी सकाळी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. दगडू सकपाळांच्या शिवसेना प्रवेशामुळे उबाठाला मोठा धक्का बसेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

उद्धव यांच्या पक्षाचे माजी आमदार आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख दगडू सकपाळ यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उबाठा आणि मनसेच्या संयुक्त प्रचारसभेआधीच रविवारी सकाळी दगडू सकपाळ शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. दगडू सकपाळ हे मुक्तागिरी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता पक्षप्रवेशाच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. अनेक वर्षे पक्षाचे काम करुनही मुलीसाठी तिकीट मागितल्यावर नकार ऐकावा लागला. यामुळे दगडू सकपाळ नाराज झाले. त्यांनी माध्यमांसमोर अतिशय भावनिक प्रतिक्रिया दिली. मी म्हातारा झालो, आता माझा पक्षाला उपयोग वाटत नसेल पण तरुणपणात मी पक्षासाठी सर्वस्व दिले. पण आता त्यांचा वेगळा विचार असेल तर मलाही विचार करावा लागेल, असे सांगत दगडू सकपाळ यांनी उबाठा सोडण्याचे संकेत दिले.

दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ शिवडी विधानसभेतील प्रभाग क्रमांक २०३ मधून इच्छुक होती. पण उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी देण्यास नकार दिला. रेश्मा सकपाळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर नाराज असलेल्या दगडू सकपाळ यांनी उबाठा सोडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन दिवसापूर्वी दगडू सकपाळ यांची त्यांच्या परळ येथील राहत्या घरी भेट घेतली होती. याच भेटीत एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रवेश करण्यासाठी बोलणी केली. विचार करून कळवतो, असे सपकाळ यांनी त्यावेळी सांगितले. अखेर दगडू सपकाळ यांनी उबाठा सोडण्याचा विचार पक्का केल्याचे समजते.

Comments
Add Comment