Monday, January 12, 2026

‘वुमन्स प्रीमिअर लीग’चा आजपासून नवी मुंबईत थरार

‘वुमन्स प्रीमिअर लीग’चा  आजपासून नवी मुंबईत थरार

सलामीच्या लढतीत मुंबई आणि बंगळूरु आमने-सामने

मुंबई : वुमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेचा चौथा हंगाम शुक्रवार (आजपासून) सुरू होत आहे. नवी मुंबईत होणाऱ्या सलामीची लढतीत मुंबई इंडियन्ससमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान असेल. भारतीय महिला क्रिकेट संघाने २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईत दक्षिण आफ्रिकेला नमवत विश्वविजेतेपदावर कब्जा केला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची जेतेपदावरची सद्दी मोडून काढत भारताने जेतेपदावर नाव कोरले. जेतेपदासह या भारतीय महिला क्रिकेटपटूंचे आयुष्य बदलून गेले आहे.

जेतेपदाच्या हृदय आठवणी ताज्या असतानाच भारतासह जगभरातल्या महिला क्रिकेटपटू वुमन्स प्रीमिअर लीगच्या नव्या हंगामासाठी सज्ज झाल्या आहेत. शुक्रवारी नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आणि पहिला सामना होणार आहे. क्रिकेट आणि मनोरंजनाचा अनोखा संगम साधत, यंदाच्या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूडचा तडका पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध गायक हनी सिंग आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हे त्यांच्या दमदार परफॉर्मन्सने चाहत्यांचे मनोरंजन करतील. या स्टार परफॉर्मन्सेसमुळे सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

यंदाच्या हंगामातले सामने नवी मुंबईतल्या डीवाय पाटील मैदान तसंच बडोद्यात होणार आहेत. नवी मुंबईत सलामीच्या लढत ही मुंबई इंडियन्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुमध्ये आहे. ९ ते १७ जानेवारी या कालावधीत नवी मुंबईत ११ लढती असतील तर पुढच्या ११ लढती बडोद्यात होणार आहेत. यामध्ये प्लेऑफ्सचाही समावेश आहे. १ फेब्रुवारीपर्यंत प्राथमिक फेरीचे सामने होतील. एलिमिनेटर ३ फेब्रुवारी रोजी होईल तर अंतिम मुकाबला ५ फेब्रुवारीला रंगणार आहे.

मुंबई इंडियन्स संघाने २०२३ मध्ये झालेल्या पहिल्या वहिल्या वुमन्स प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावले होते. २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाने जेतेपदावर नाव कोरले. मुंबई इंडियन्सने गेल्यावर्षी पुन्हा एकदा जेतेपदाची कमाई केली. यंदा जेमिमाह रॉड्रिग्ज (दिल्ली कॅपिटल्स) आणि ॲशले गार्डनर (गुजरात जायंट्स) यांच्यासारख्या नव्या नेतृत्वामुळे स्पर्धेत काय वेगळे पाहायला मिळेल, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष राहिले. दरम्यान मुंबई इंडियन्स (गतविजेता) आणि आरसीबी या दोन लोकप्रिय संघांमध्ये सलामीची लढत होत असल्याने सर्वांचेच लक्ष या सामन्यावर राहणार आहे. तसेच हरमनप्रीत आणि स्मृती या दोन भारतीय स्टार्समधील द्वंद्व पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यात महिला क्रिकेटचा वाढता दर्जा आणि लोकप्रियतेमुळे डब्ल्यूपीएल २०२६ साठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सहभागी संघ आणि त्यांचे कर्णधार

  •  मुंबई इंडियन्स : हरमनप्रीत कौर
  •  रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु : स्मृती मानधना
  •  दिल्ली कॅपिटल्स : जेमिमाह रॉड्रिग्ज
  •  गुजरात जायंट्स : ॲशले गार्डनर
  •  यूपी वॉरियर्झ : मेग लॅनिंग
Comments
Add Comment