Saturday, January 10, 2026

पोलिसांना चवकण्यासाठी चोरांनी लढवली अजब शक्कल...

पोलिसांना चवकण्यासाठी चोरांनी लढवली अजब शक्कल...

नवी मुंबई : चोरी केल्यानंतर पोलिसांचा तपास चुकवण्यासाठी गुन्हेगार कोणत्या थराला जाऊ शकतात, याचे धक्कादायक उदाहरण सानपाडा येथील सोन्याच्या चोरी प्रकरणातून समोर आले आहे. घरफोडीनंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद होऊ नये म्हणून चोरट्यांनी तब्बल अडीच तास थेट रेल्वे रुळांवर थांबण्याची अफलातून युक्ती वापरली. मात्र पोलिसांनी केलेल्या तांत्रिक आणि गुप्त तपासामुळे अखेर या चोरीचा छडा लागला आहे.

चोरीनंतर अफलातून युक्ती

सानपाडा परिसरातील एका बंद घरात मागील महिन्यात घरफोडी झाली होती. या चोरीत चोरट्यांनी घरातील सुमारे २१ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. चोरीनंतर आपला मागमूस लागू नये यासाठी आरोपींनी स्वतःकडे मोबाइल फोन न ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने त्यात कैद होऊ नये म्हणून त्यांनी वेगळीच शक्कल लढवली. मध्यरात्री तीन वाजल्यापासून पहाटे साडेपाच वाजेपर्यंत ते थेट रेल्वे रुळांवर बसून राहिले.

सराईत गुन्हेगारांची ओळख पटली

या प्रकरणी आरिफ अन्सारी (वय ३४) आणि इस्तियाख अन्सारी (वय ५८) या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही टिटवाळा परिसरातील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चोरी करण्यापूर्वी त्यांनी संबंधित घराची सखोल रेकी केली होती. चोरीनंतर पोलिसांचा तपास भरकटावा, यासाठीच त्यांनी ही अनोखी युक्ती अवलंबल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांच्या तपासाने केला पर्दाफाश

तपासात सुरुवातीला आरोपी स्टेशनपर्यंत आले असल्याचे स्पष्ट झाले होते, मात्र त्यानंतर त्यांच्या हालचालींचा कोणताही ठोस मागमूस मिळत नव्हता. गुन्हे शाखा कक्ष १ च्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती आणि संशयास्पद हालचालींचा बारकाईने अभ्यास केला. पहाटे पहिली लोकल पकडण्यासाठी रुळांवरून बाहेर येणाऱ्या संशयित व्यक्तींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. अखेर तपास टिटवाळा परिसरापर्यंत पोहोचला आणि नियोजनबद्ध सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने महत्त्वाची कामगिरी बजावली.

Comments
Add Comment