मुंबई विद्यापीठाकडून अपयश लपविण्यासाठी विद्यार्थ्यांवर खापर
मुंबई : मुंबई विद्यापीठाने पीएचडी करणाऱ्या तब्बल ५५३ विद्यार्थ्यांची नोंदणी रद्द केली असून याविरोधात विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. संशोधनाच्या दृष्टीने आवश्यक वातावरण, पुरेसे प्राध्यापक व मार्गदर्शक, प्रशासकीय व्यवस्था यांचा अभाव, तसेच संशोधनासाठी आवश्यक व पुरेसा डाटा उपलब्ध करण्याकडे मुंबई विद्यापीठ अपयशी ठरले आहे. मात्र याचे खापर विद्यार्थ्यांवर फोडून विद्यापीठाने आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
पीएचडी हा दीर्घकालीन व बहुआयामी प्रवास आहे. त्यात विद्यार्थ्याला मार्गदर्शक, प्रयोगशाळा, संसाधने, विभागीय पातळीवरील प्रगती अहवाल, मंजुरी प्रक्रिया, निधी इत्यादी अनेक घटकांचा आधार आवश्यक असतो. मात्र मुंबई विद्यापीठ पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या सुविधा पुरविण्यात अपयशी ठरले आहे. मार्गदर्शकांची संख्या अपुरी असल्याने पीएचडी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना योग्य वेळी मागर्दशक मिळाले नाहीत. त्यामुळे संशोधन विषय महिनामहिने प्रलंबित राहिला. काहींच्या प्रगती अहवालांना प्रशासकीय यंत्रणेकडून उत्तरही दिले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांची पीएचडी ८ ते १० वर्षे रखडली. कोरोनामध्ये बहुतांश संशोधन थांबले होते. विद्यापीठाकडून योग्य वेळी प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि संसाधने मिळाली नाहीत.
मागील ८ ते १० वर्षांत संशोधनाची स्थिती, विभागांनी केलेले मार्गदर्शन, तसेच विद्यापीठाने किती वेळा प्रत्यक्ष प्रगती तपासली याबाबत कधीच आढावा घेण्यात आला नसल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक ताण-तणाव, भविष्याची भीती आणि व्यावसायिक अनिश्चिततेला सामोरे जावे लागते. मात्र याकडे विद्यापीठाने दुर्लक्ष केल्याबद्दल विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.






