मुंबई : दररोज लालपरीने किंवा ई-बसने प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नवी ई बसपास योजना सुरू केली आहे. प्रवाशांच्या खिशाला परवडणारी आणि पर्यावरणपूरक प्रवासाला चालना देणारी 'नवीन मासिक आणि त्रैमासिक पास योजना' जाहीर करण्यात आली आहे. "२० दिवसांचे भाडे भरा आणि ३० दिवस बिनधास्त प्रवास करा," असे या योजनेचे मुख्य आकर्षण आहे. परिवहन मंत्री सरनाईक यांच्या संकल्पनेतून ही योजना साकारली आहे. खासगी वाहनांचा वापर कमी करून नागरिकांनी आरामदायी ई-बसकडे वळावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ९० दिवसांच्या प्रवासासाठी ६० दिवसांचे भाडे आकारले जाईल. येथे तब्बल एका महिन्याचे भाडे वाचणार आहे. ही सवलत महामंडळाच्या ताफ्यातील ९ मीटर आणि १२ मीटर ई-बसेस तसेच 'ई-शिवाई' बस सेवेसाठी लागू असेल. सध्या एसटीच्या ताफ्यात साधारणपणे ५०० हून अधिक ई-बसेस धावत असून, आगामी काळात ही संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे.






