प्रभाग चारमधील लढतीकडे शहराचे लक्ष
गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिकेची निवडणूक एकूण ११५ जागांसाठी होत आहे. मात्र महापालिकेच्या या आखाड्यात २० ते २५ ठिकाणी होणाऱ्या राजकीय कुस्त्या चांगल्याच रंगणार आहेत. संपूर्ण शहराचे लक्ष लागून असलेली सर्वाधिक तुल्यबळ लढत ही प्रभाग क्रमांक चार ‘ड’ मध्ये पाहायला मिळणार आहे. बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव यशवंत पाटील आणि बहुजन विकास आघाडीला राम राम करीत भाजपसोबत घरोबा केलेले माजी नगरसेवक महेश हरी पाटील या दोन तगड्या उमेदवारांमध्ये या ठिकाणी थेट लढत होणार आहे.
वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्या आनुषंगाने निवडणुकीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शनिवारी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले असून, आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. वसई-विरारमध्ये मुख्य लढती ह्या महायुती आणि बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये होणार आहेत. शिवसेना, उबाठा आणि काँग्रेसने उमेदवार दिलेल्या काही प्रभागात तिरंगी लढतीचे चित्र आहे. सतत १० वर्ष महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या बहुजन विकास आघाडीने सर्वाधिक ११३ जागांवर आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत.
भाजपकडून ९३ उमेदवार निवडणूक लढवीत असून यापैकी ४ जागांसाठी शिवसेना (शिंदे गट) याच्या उमेदवारांमध्ये भाजपची मैत्रीपूर्ण लढत होत आहे, तर ८९ जागेवर भाजपने आपले उमेदवार दिले आहेत. दरम्यान, निवडणूक म्हटली की, मोठ्या लढतीची चर्चा होणारच आहे. वसई- विरारमध्ये सुद्धा अशा २० ते २५ लढतींची चर्चा सर्वत्र होत आहे. मात्र सर्वाधिक चर्चा ही प्रभाग ४ ‘ड’ येथील लढतीबाबत होत आहे.
बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव माजी नगरसेवक अजिव यशवंत पाटील हे सर्वाधिक चर्चेतील उमेदवार आहेत. कारणही तसेच आहे. एकेकाळी बहुजन विकास आघाडीच्या मुख्य फळीतील चेहरा असलेले माजी नगरसेवक महेश हरी पाटील यावेळी शिट्टीची साथ सोडून कमळावर लढत आहेत आणि त्यांच्या विरोधात बहुजन विकास आघाडीने अजिव पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. अनेक वर्ष ठाकूर कुटुंबीयांशी आणि बहुजन विकास आघाडीसोबत सलोख्याचे संबंध असणाऱ्या महेश पाटील यांनी नुकतेच कमळ हाती घेतले आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीने तगडा उमेदवार म्हणून अजीव पाटील यांना या प्रभागात संधी दिली आहे.
अशा होणार इतर तुल्यबळ लढती
सुदेश चौधरी (शिवसेना) × प्रशांत राऊत (बविआ)
मनोज पाटील (भाजप) × हरिओम श्रीवास्तव (बविआ)
पंकज ठाकूर (बविआ) × मेहुल शहा (भाजप)
रिना वाघ (भाजप) × सुरेखा कुरकुरे (बविआ)
माया चौधरी (भाजप) × अमृता चोरघे (बविआ)
नारायण मांजरेकर (भाजप) × विनोद पाटील (बविआ)
हार्दिक राऊत (बविआ) × गौरव राऊत (भाजप)
हितेंद्र जाधव (भाजप) × स्वप्नील पाटील (बविआ)
विश्वास सावंत (भाजप) × निलेश देशमुख (बविआ)
अतुल पाटील (शिवसेना) × कल्पेश मानकर (बविआ)
अशोक शेळके (भाजप) × किरण भोईर (अपक्ष)
किरण ठाकूर (बविआ) × रवी पुरोहित (भाजप)
धनंजय गावडे (बविआ) × जयप्रकाश सिंह (भाजप)
महेश सरवणकर (भाजप) × वृंदेश पाटील (बविआ)
विजय घरत (भाजप) × सदानंद पाटील (बविआ)
कल्पक पाटील (भाजप) × निषाद चोरघे (बविआ)
पंकज देशमुख (भाजप) × अमित वैध (बविआ)
मनीष वैध (भाजप) × प्रफुल साने (बविआ)
नितीन ठाकूर (भाजप) × आशिष वर्तक (बविआ)
मॅथ्यू कोलासो (भाजप) × प्रकाश रॉड्रिग्ज (बविआ)
प्रदीप पवार (भाजप) × प्रवीण नलावडे (बविआ)
मनिषा जोशी (भाजप) × स्यारल डाबरे (काँगेस)
विशाल जाधव (भाजप) × रुपेश जाधव (बविआ)






