Wednesday, January 7, 2026

राज्यात ढगाळ हवामानाचा मुक्काम

राज्यात ढगाळ हवामानाचा मुक्काम

आंबा-काजू उत्पादक शेतकरी संकटात?

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्यानंतर आता हवामानात अचानक मोठा बदल झाला आहे. राज्याच्या अनेक भागांत थंडीचा कडाका ओसरला असून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या हवामान बदलाचा सर्वाधिक फटका कोकण आणि मध्य महाराष्ट्राला बसला असून, ऐन भरात आलेल्या आंबा आणि काजूच्या हंगामावर संकटाचे सावट निर्माण झाले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील किमान तापमानात आज मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीसह अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. जरी पावसाची शक्यता कमी असली, तरी हे ढगाळ हवामान पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. यामुळे जानेवारीतील गारवा अचानक गायब झाला असून हवेत उकाडा जाणवू लागला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवार सायंकाळपासून वातावरणात वेगाने बदल झाले आहेत. आधी दाट धुके आणि आता ढगाळ हवामानामुळे आंबा व काजू बागायतदार चिंतेत पडले आहेत. गेल्या ४-५ वर्षांनंतर यंदा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये चांगली थंडी पडल्याने आंबा आणि काजूला विक्रमी मोहोर आला आहे. किनारपट्टी भागात तर पानांपेक्षा मोहोरच जास्त अशी स्थिती आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून वाढलेले धुके आणि आताचे ढगाळ वातावरण यामुळे 'टी मॉस्किटो' (तुडतुडे) आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहाटेच्या वेळी झाडांवरून पावसासारखे पाणी पडत असल्याने मोहोराची गळती होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

यंदा चांगल्या थंडीमुळे आंबा, काजूला उत्तम मोहोर आला असून, काही भागांत फळधारणादेखील झाली आहे. दमट वातावरणामुळे किडरोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बागांचे निरीक्षण करून विद्यापीठाने शिफारस केलेल्या कीटकनाशक, बुरशीनाशकांची फवारणी करावी. इतर व्यवस्थापनदेखील कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार करावे.

- डॉ. यशवंत मुठाळ, तांत्रिक अधिकारी, संशोधन केंद्र, मुळदे

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >