गेल्या आठवड्यातच बेस्ट उपक्रमात खासगीकरण का नको यावर प्रकाश टाकत असतानाच दुर्दैवाने भांडुप बेस्टचा अपघात घडला. कुर्ला येथे झालेल्या अपघाताची आठवण झाली. योगायोगाने वर्ष संपता संपता झालेला हा अपघात आणि गेल्या वर्षी याच कालावधीत झालेला कुर्ल्यातील तो अपघात दोन्हीही बस एकाच कंपनीच्या, म्हणून यावर आता पुन्हा ऊहापोह करणे आवश्यक आहे.
वर्ष संपता संपता भांडुप येथे झालेला अपघात हा दुर्दैवीच. गेल्यावर्षी कुर्ला येथे झालेला अपघातही वर्ष संपता संपता झाला. दोघांमध्ये ओलेक्ट्रा या खाजगी बस गाडीचा अपघात सारखा नसला तरी गेल्या सोमवारची बस मिडी होती तर कुर्ला येथे झालेल्या अपघातातली बस ही बारा मीटर मोठी होती. भांडुप येथे पादचाऱ्यांना बसने चिरडले व कुर्ला येथील बस अपघातातही पादचाऱ्यांनाच बसने चिरडले. दोन्ही अपघातांतील अहवालामध्ये बस चालकालाच जबाबदार ठरवले गेले आणि पुन्हा सर्वजण मोकळे झाले. वास्तविक या बसगाड्यांच्या त्रुटीकडे आजतागायत कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही. सर्वचजण निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त आहेत. मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत करून सर्वजण मोकळे झाले, मात्र बसबाबत निर्माण झालेले प्रश्न हे जशेच्या तसे राहिलेत. या अपघाताबद्दल बरेच प्रश्न निर्माण झाले. वास्तविक बस खासगी कंत्राटदाराची होती. मग यावर बेस्टचा चालक कसा? जेव्हा या कंपनीबरोबर करार झाला तेव्हा त्यांनी चालक दल पुरवणे आवश्यक होते. मात्र कंत्राटदारांकडील बस चालक टिकत नाहीत आणि मग नाईलाजाने बेस्टचे चालक वापरावे लागतात. थोडेफार चालक प्रशिक्षण देऊन त्यांना विद्युत बस गाड्यांवर पाठवण्यात येते. मागील वर्षी कुर्ला येथील जो अपघात घडला त्यातील बस चालकाला काही थोड्या दिवसांचे जुजबी प्रशिक्षण देऊन या विद्युत बसगाडीवर पाठवण्यात आले होते. बस गाडीचा अहवाल काय आला हे सारे गुलदस्त्यातच राहिले. मात्र त्या कंपनीला वाचवण्यासाठी अखेर संपूर्ण यंत्रणेलाच बस चालकाचा बळी द्यावा लागला. दहा ते वीस हजार करोड असलेली ही कंत्राटे टिकवण्यासाठी कोणाचा तरी बळी द्यावाच लागणार.
भांडुप बस अपघातातील बस चालकावर सध्या यंत्रणेनेच घाव घातला आहे. यंत्रणा कशा पद्धतीने काम करते आहे याचे हे उत्तम उदाहरण. वास्तविक पाहता ही बस गेले काही दिवस दुरुस्ती कामामुळे उभी होती. जेव्हा ती रस्त्यावर आली तेव्हा त्याबाबत वारंवार तक्रारी केल्या गेल्या होत्या. तरी मात्र त्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि अखेर अपघात हा घडलाच. सुरक्षित आरामदायी प्रवास म्हणून या बसेना प्रवासी प्राधान्य देतात. आशिया खंडातील सर्वात दर्जेदार सेवा देणारी म्हणून बेस्ट उपक्रमाची जगभरात ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून तोट्याच्या नावाने बेस्ट उपक्रमात कंत्राटी पद्धतीने बेस्ट उपक्रमाला पूर्णपणे वेढले आहे. कंत्राटी पद्धतीवर बसेनंतर कंत्राटी चालक व वाहक यामुळे बेस्ट उपक्रमाची खासगीकरणाकडे वाटचाल सुरु आहे. मात्र हे खासगीकरण नसल्याचे बेस्ट उपक्रमाने स्पष्ट केले असले तरी प्रत्यक्षात कंत्राटी पद्धतीवर बेस्ट उपक्रमाचा अंकुश नाही, हे वारंवार सिद्ध होत आहे. आज संपूर्ण कारभार कंत्राटी पद्धतीवर अवलंबून आहे. कंत्राटी पद्धत बेस्ट उपक्रमासाठी तापदायक ठरु लागली असून बेस्टचे कायमस्वरूपी कर्मचारी यात नाहक बदनाम होत आहेत. मुळात खासगीकरणामागे बेस्ट इतकी वाहवत गेली, की त्याच्या मूळ उद्दिष्टापासूनच भरकटत चालली आहे. काही महिन्यांपूर्वी बेस्टकडे ५०० हून जास्त मिडी बस गाड्या होत्या. मात्र त्या कालांतराने भंगारात गेल्या. मुंबईच्या उपनगरातील काही पूर्व व पश्चिम उपनगरातील काही ठिकाणी अशी आहेत, की तिथे छोटे व अरुंद गल्लीबोळातील रस्ते आहे. तेथे बेस्ट सेवा सुरू होत्या. मात्र कालांतराने त्यात घट होऊ लागली. जेथे बस सेवा सुरू होत्या, तिथे चालवण्यासाठी बेस्टकडे त्या प्रकारच्या बस गाड्या नाही, म्हणून खासगी कंत्राटदारांकडे बस गाड्या चालवण्याचा प्रयत्न केल्यास मात्र तोही निष्फळ ठरला आणि अखेर बऱ्याच ठिकाणी या बस सेवा बंद कराव्या लागल्या.
कांजूर, भांडुपमधील जेथे अपघात झाला तेथे नरदास नगर, टेंभीपाडा, प्रताप नगर तसेच डोंगराळ भागात छोट्या गल्ल्या असल्याने तेथे मिडी प्रकारच्या बस गाड्या बेस्टने काही काळापूर्वी बनवून घेतल्या होत्या. मात्र नंतर बेस्टने बस खरेदी करणे बंद केले. जास्त बोंबाबोंब झाल्याने लोकप्रतिनिधींनी बेस्टवर दबाव टाकण्यास सुरुवात केली व काळा किल्ला आगारातून मिनी बस गाड्या या विक्रोळी आगारात आणून भांडुप, कांजूरमार्ग परिसरात चालवण्यात येऊ लागल्या. बऱ्याच बस चालकांनी तेथे बस चालवण्यास नकार दिला. काही ठरावीक बस गाड्या धावत होत्या. मात्र या अत्याधुनिक खासगी बस गाड्या या पटकन वेग घेतात. त्यामुळे उतारावरही या बस गाड्यांवर ताबा राहत नाही. अशा बऱ्याच तक्रारी होत्या. तरी बेस्टने त्या चालू ठेवल्या आणि भांडुप येथे ही दुर्दैवी घटना घडली. अशा बऱ्याच तांत्रिक व इतर समस्या या लोकप्रतिनिधी तसेच कामगार संघटना यांनी बेस्ट उपक्रमाच्या निदर्शनास यापूर्वी आणून दिल्या होत्या. मात्र या सर्व तक्रारांकडे बेस्ट उपक्रमाने दुर्लक्ष केले आणि त्याची परिणिती अपघातात झाली. कुर्ला व भांडुप येथे झालेला अपघात अरुंद रस्त्यांमुळे झाला. पदपथावर असलेल्या अतिक्रमणांमुळे झाला. भांडुप व कुर्ल्याचा अपघातही अशाच कारणांमुळे झाला. आता यावर उपाय म्हणून बेस्ट व्यवस्थापक यांनी सर्व बेस्ट चालकांना विद्युत बस गाड्यांचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य केले आहे. बेस्ट बस चालकांच्या प्रशिक्षणाचा प्रश्न त्यामुळे कंत्राटदाराचा आहे त्यासाठी बेस्टच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांनी विद्युत बस गाडीचे प्रशिक्षण का घ्यावे? बेस्टकडे स्वमालकीच्या फक्त सहा विद्युत बस गाड्या आहेत व आगामी काळात स्वमालकीच्या बस गाड्या घेणे बेस्टला परवडण्यासारखे नाही. मग कंत्राटदारांच्या बस गाड्यांवर प्रशिक्षण घेऊन पुन्हा अपघात घडल्यास बेस्ट बस चालकाला पुन्हा जबाबदार ठरवणार? अशा व्यवस्थेचा बळी बेस्टच्या कर्मचाऱ्यांना ठरवले जाणार का? का आता तरी यात सुधारणा होणार, याचे उत्तर येणारा काळ देईल? हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
अल्पेश म्हात्रे





