Saturday, January 3, 2026

मतदानाआधीच महायुतीचा जयजयकार

मतदानाआधीच महायुतीचा जयजयकार

गेल्या ११ वर्षांत केंद्रातील मोदी सरकारच्या लोकाभिमुख कार्यामुळे विरोधक इतके हतबल झाले आहेत की, निवडणुकीच्या रणागंणात लढण्याआधी नांगी टाकण्याचे प्रकार देशभर घडत आहेत. राज्यातील २९ महापालिका निवडणुकीत त्यांचे प्रत्यंत्तर दिसले आहे. १५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान असले तरी राज्यातील २९ महापालिकेत ६४ पेक्षा अधिक महायुतीचे उमेदवार निवडणुकीआधीच निवडून आले आहेत.

धर्मग्रंथामध्ये अश्वमेध यज्ञाचे वर्णन आढळते. वाल्मिकी रामायणानुसार श्रीरामाने, महाभारतानुसार युधिष्ठीराने हा यज्ञ केला होता. या यज्ञअंतर्गत एक अश्व सोडला जात असे. हा घोडा ज्या ठिकाणापर्यंत जात असे, त्या ठिकाणापर्यंतची सर्व भूमी यज्ञ करणाऱ्या व्यक्तीची मानली जात असे. हा अश्व ज्या राज्यांत जाईल तेथील राजाला मांडलिक व्हावे लागे. जर एखाद्या व्यक्तीने याचा विरोध केला तर यज्ञ करणाऱ्या व्यक्तीला त्यासोबत युद्ध करावे लागत असे. हा पौराणिक कथेतील भाग झाला. लोकशाही प्रणालीत राजेशाहीला काही किंमतच नसते. लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हेच जनतेचे नेतृत्व मानले जाते. त्यांना मिळणारा मानसन्मान, अधिकार यांची तुलना एखाद्या राजासोबत करणे ही चूक असली तरी, जनतेतून निवडून आलेले लोकप्रतिनिधीच मायबाप सरकार बनवत असल्याने, निवडणुका हा लोकशाहीतील मोठा आधार आहे. भारताचा कोणीही नागरिक निवडणुकीला उभा राहू शकतो. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेवर येण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात स्पर्धा सुरू असते; परंतु गेल्या ११ वर्षांत केंद्रातील मोदी सरकारच्या लोकाभिमुख कार्यामुळे विरोधक इतके हतबल झाले आहेत की, निवडणुकीच्या रणागंणात लढण्याआधी नांगी टाकण्याचे प्रकार देशभर घडत आहेत. राज्यातील २९ महापालिका निवडणुकीत त्यांचं प्रत्यंत्तर दिसले आहे. १५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान असले तरी राज्यातील २९ महापालिकेत ६४ पेक्षा अधिक महायुतीचे उमेदवार निवडणुकीआधीच निवडून आले आहेत. राज्यातील विकास प्रकल्प, 'लाडकी बहीण'सारख्या योजनांची अंमलबजावणी तळागाळातून उमेदवारांपर्यंत पोहोचल्याने काही प्रभाग विरोधकांना उमेदवार मिळू नये यासारखी विरोधकांची नामुष्की नाही.

महापालिकांच्या निवडणुका या स्थानिक प्रश्नांवरच होतात. शहर / प्रभागातील रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती आदी नागरी सुविधांच्या प्रश्नांभोवती त्याची चर्चा असते. मात्र, २९ महापालिकांच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची महायुती, तर काही ठिकाणी राष्ट्रवादीसोबत युती करून निवडणुका लढविल्या जात आहेत. या तीन पक्षांची उमेदवारी मिळावी यासाठी हजारो इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी स्थानिक नेत्यांपुढे काही ठिकाणी गोंधळ करून दादही मागितली. याचा अर्थ या तीन पक्षांकडून उमेदवारी मिळाली, की आपण हमखास निवडून येऊ अशी खात्री त्यांना होती. दुसऱ्या बाजूला, काही प्रभागांमध्ये विरोधी पक्षांना जिंकून येईल याची खात्री नसल्याने आपला उमेदवार जाहीर न करता भाजप-शिवसेनेतून आलेल्या इच्छुक उमेदवारांना उमेदवारी दिली गेली. उदाहरण द्यायचे झाले, तर आसावरी पाटील या भाजपच्या माजी नगरसेविकेला मुंबईतून उबाठाने उमेदवारी दिली आहे. विरोधकांकडे स्थानिक प्रश्नांवर जनतेची कामे करण्यासारखा कोणताही ठोस कार्यक्रम नसल्याने मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव, मराठी विरुद्ध अमराठी वाद निर्माण करून, मुंबईतल्या मराठी मतदारांची एकगठ्ठा मते कशी मिळतील, याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील मुस्लिमांची मते आपल्या बाजूने राहावीत यासाठी उबाठा आणि मनसेसारखे पक्ष जिहादीच्या मुद्द्यांवर मान खाली घालून बसले आहेत. राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत युती करून निवडणुकीसाठी जागावाटप केले. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना ६२ जागा घेतलेल्या वंचित बहुजन आघाडीने १६ प्रभागात उमेदवारच दिला नाही. त्याजागी काँग्रेसने उमेदवार उभा करावा, असे ऐनवेळी सांगितले. काँग्रेसकडे त्या ठिकाणी उमेदवार नसल्याने, दोन प्रमुख पक्षांना मुंबईसारख्या महानगरात उमेदवार मिळत नाही, हे समोर जनतेसमोर आले. त्यात, निवडणुकांचा प्रचार सुरू होण्याआधीच महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून येत आहेत, विरोधकांना त्यामुळे आधीच धडकी भरली आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांतील ६४ उमेदवारांनी निवडणुकीआधीच गुलाल उधळला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आमदारकीचा मतदारसंघ असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपच्या १५ उमेदवारांचा या ६४ जणांत समावेश आहे. महायुती सरकारमधील संकटमोचक मंत्री गिरीष महाजन यांच्या जळगाव महापालिकेत महायुतीचे एकूण १३ उमेदवार, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातील ठाणे महापालिकेत शिवसेनेचे तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. ‘बिनविरोध निवडून आला’ असे आपण सहज बोलून जातो; परंतु त्यामागे मोठी व्यूहरचना असते. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अपक्षांसह छोट्यामोठ्या पक्षातील उमेदवारांना समजावून 'थंड करणे’ ही काही तितकीशी सोपी गोष्ट नाही. महायुतीचा प्रभाव असल्याने प्रस्थापित विरोधी पक्षांच्या उमेदवारांना चांगला उमेदवार मिळत नसल्याने त्यांनी आधी शरणागती पत्करली असली, तरी भावी नगरसेवकांची स्वप्न पाहून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांना एखाद्या ठिकाणी माघार घ्यायला लावणे हेही कौशल्य असते. याचा अर्थ महायुतीच्या नेत्यांनी केलेले मनधरणीचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. महाराष्ट्रात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्याचे स्वागत होईलच. पण यामुळे महायुतीला निवडणुकीआधीच शंभर हत्तीचे बळ मिळेल, एवढे नक्की.

Comments
Add Comment