रवींद्र तांबे
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या केवळ पहिल्या महिला शिक्षिका नव्हत्या, तर स्त्री शिक्षणाच्या क्रांतीच्या जननी होत्या. समाजाच्या तीव्र विरोधाला सामोरे जात त्यांनी महिलांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले आणि ‘चूल-मूल’च्या बंधनातून स्त्रीला मुक्त केले. त्यांच्या विचारांनी आणि कार्याने आजच्या महिला प्रगतीचा पाया घातला. सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणजे स्त्री शिक्षण, समता आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रेरणांचा जागर.
शिक्षणाशिवाय स्त्री ही मुळे किंवा पाने नसलेल्या वडाच्या झाडासारखी आहेत, ती तिच्या मुलांचे पालनपोषण करू शकत नाही आणि स्वतः जिवंत राहू शकत नाही. तसेच शिक्षण हे तुमचे मन उघडण्याची गुरुकिल्ली आहे आणि ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी करण्यास सक्षम करते असे सांगणाऱ्या आपल्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका, कवयित्री आणि समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांची आज १९५वी जयंती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामधील नायगांवमध्ये झाला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई, तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. वयाच्या ९ व्या वर्षी अर्थात १८४० साली महात्मा जोतीराव फुले यांच्याशी विवाह झाला. त्यावेळी जोतीराव फुले हे १३ वर्षांचे होते.
आज देशात महिला प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहेत. त्याचे एकमेव कारण म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होय. त्यावेळी लोकांचा विरोध असून सुद्धा महिलांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांना संघर्षाचा सामना करावा लागला. यामध्ये त्या यशस्वी होऊन महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यांनी ‘चूल आणि मूल’ या बेडीतून महिलांना मुक्त केले. त्यामुळे आज उच्च पदावर महिला विराजमान झालेल्या दिसत आहेत. आपल्या आयुष्यात महिलांना सुशिक्षित करून त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले. त्या निरक्षर असून सुद्धा प्रथम शिकल्या. त्यांनी न डगमगता आपले ध्येय डोळ्यांसमोर ठेवले. शिक्षणाची ज्योत कायम मनात तेवत ठेवली. त्यामुळे आज अनेक ज्योती निर्माण झाल्या.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पती महात्मा जोतीराव फुले यांच्या मदतीने पुण्यामधील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. त्या शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिका त्या आधी पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले झाल्या. या शाळेत नऊ मुली होत्या. क्रांतिवीर लहुजी साळवे यांची पुतणी मुक्ता साळवे या त्यांच्या पहिल्या विद्यार्थींनी. १५ मार्च १८५२ पर्यंत म्हणजे जवळ जवळ चार वर्षांत मुलींसाठी १८ शाळा सुरू केल्या. यामध्ये १८४९ साली मुस्लीम महिलांना आणि लहान मुलांना साक्षर करण्यासाठी पुण्यात उस्मान शेख या मुस्लीम बांधवाच्या घरी शाळा सुरू केली. म्हणजे त्यावेळी महिलांना शिक्षणाची परवानगी नसताना सुद्धा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीराव फुले या दाम्पत्यांनी केवढे शैक्षणिक महान कार्य केले याचे आत्मपरीक्षण आजच्या महिलांनी करणे गरजेचे आहे. कारण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी विशेषत: महिलांच्या शिक्षणाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आपल्या आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत शिक्षण क्षेत्रात काम करत राहिल्या. त्यामुळे शिक्षणक्षेत्रातील त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल ब्रिटिश शासनाने १६ नोव्हेंबर १८५२ रोजी त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. बालहत्या होऊ नये म्हणून त्यांनी २८ जानेवारी १८६३ रोजी आपल्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून प्रसूतिगृहही सुरू केले. त्याची देखरेखीची संपूर्ण जबाबदारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले करीत असत. तसेच १८९६ च्या दुष्काळात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि लोकांचे आर्थिक नुकसान झाले. त्यावेळी त्यांनी शरीरविक्रय करणाऱ्या बायांना आधार देण्यासाठी त्यांना सत्यशोधक कुटुंबाच्या आश्रयास ठेवले.
आज शाळांचा विचार केल्यास दिवसेंदिवस शाळेतील मुलींची संख्या वाढत असून उच्च शिक्षणामध्ये सुद्धा मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक आहे. आपल्या राज्यात महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थिनींना आर्थिक सहाय्य म्हणून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती सुरू आहे. तेव्हा या शिष्यवृत्तीचा लाभ महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील मुलींनी घ्यावा. राज्यात अल्पसंख्याक समुदायामध्ये मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि पारशी या समुदायातील मुलींचा समावेश होतो. तेव्हा या शिष्यवृत्तीची कल्पना अजून बऱ्याच मुलींना नाही. त्यामुळे अशा शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागते. १२ जानेवारी १९९६ पासून इयत्ता ५ वी ते ७ वीसाठी आणि इयत्ता ८ वी ते १० वीपर्यंत २५ जुलै, २००३ पासून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. तेव्हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यावेळी म्हणायच्या वेळ विनाकारण व्यर्थ घालवू नका, जा आणि शिक्षण प्राप्त करा! तसेच शिक्षण ही प्रत्येक स्त्रीच्या मुक्ततेची गुरुकिल्ली आहे असे त्यांना वाटायचे. तेव्हा आजच्या विद्यार्थिनींनी त्यांच्या विचारांचा गांभीर्याने विचार करून शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहायला हवे. तरच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केल्याचे फलित होईल. महिलांच्या मुक्तिदाता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन २०२० पासून ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून महाराष्ट्रात साजरा करण्यात आला तरी देशात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा होणे गरजेचे आहे.






