Saturday, January 3, 2026

विदर्भात युती-आघाडीत रणधुमाळी

विदर्भात युती-आघाडीत रणधुमाळी

अविनाश पाठक

विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर या चारही महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल होताच राजकीय चित्र अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. युतीच्या घोषणा असल्या, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी आघाड्या तुटल्या, बिघाडी झाली आणि बंडखोरी उफाळून आली. त्यामुळे या निवडणुका केवळ स्थानिक सत्तेसाठी नव्हे, तर सर्वच पक्षांसाठी ताकदीची कसोटी ठरणार आहे.

महापालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी दुपारी संपली. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, आणि चंद्रपूर या चारही महापालिकांमध्ये उत्साहात आणि जल्लोषात अर्ज दाखल केले गेले. शक्यतोवर आम्ही युतीतच लढणार असे आधी प्रत्येकच पक्ष म्हणत होता. मात्र विदर्भाच्या चारही महापालिकांमध्ये प्रत्येक ठिकाणी युती किंवा आघाडी आहेच असे चित्र नाही. कुठे कुठे बिघाडी देखील झाल्याचे दिसून आले आहे. नागपुरात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची जरी युती झाली असली तरी महायुतीतील तिसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा मात्र स्वतंत्र लढत असल्याचे चित्र आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाठा गट हे तीनही वेगवेगळे लढत असल्याचे चित्र दिसत आहे. नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शहर आहे. तसेच इथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेही चांगलेच वजन आहे. त्याचवेळी काँग्रेसमध्ये विकास ठाकरे आणि राष्ट्रवादीतून अनिल देशमुख हे देखील जोर मारताना दिसून येत आहेत.

अमरावती महापालिकेत मात्र महायुतीतील शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले त्याचवेळी परस्परांच्या आडमुठ्या धोरणामुळे युती होऊ शकली नाही असा दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. त्याचवेळी महाविकास आघाडीमध्ये मात्र समन्वय दिसत आहे. अर्थात हा समन्वय देखील किती काळ टिकेल याबाबत शंका निर्माण होत आहे. इथे बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावे यासाठी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अखेरच्या क्षणापर्यंत धावपळ केली. तसेच राणा दांपत्याच्या युवा स्वाभिमान पक्षाशी देखील तडजोड करता येईल का यासाठीही प्रयत्न केल्याची माहिती आहे. अकोल्यात भाजप आणि शिवसेना यांची युती होऊ शकली नाही, त्याचवेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची मात्र युती झालेली दिसते. शिवसेना इथे स्वबळावर लढणार असल्याची माहिती आहे. याशिवाय काँग्रेस आणि शरद पवार गट हे एकत्रितपणे लढणार असून उबाठा गट मात्र स्वतंत्रपणे लढणार आहे. याशिवाय इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एमआयएमचे देखील उमेदवार रिंगणात उतरले आहेत. बच्चू कडूंची प्रहार संघटना इथे उबाठा गटाला सहकार्य करणार आहे.

चंद्रपूर महापालिकेत शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती झालेली आहे. इथे काँग्रेस आणि उबाठा गट हे स्वतंत्रपणे लढणार असल्याचे चित्र आहे. या चारही महापालिकांमध्ये आधी भाजपचीच सत्ता होती. त्यामुळे यावेळी भाजप-शिवसेना युतीला आपली सत्ता टिकवण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. त्याचवेळी सर्वच पक्षांमध्ये असलेले गोंधळाचे वातावरण हे सर्वांच्याच विजयामध्ये अडथळा आणणारे ठरते की काय असे चित्र दिसत आहे. विशेषतः सत्ताधारी भाजपमध्ये नागपुरात आणि चंद्रपूरमध्ये बरेच गोंधळाचे वातावरण आहे. नागपुरात भाजपमध्ये बंडखोरी होऊ नये म्हणून अखेरच्या क्षणापर्यंत यादीच जाहीर केली नव्हती. आदल्या रात्री एकेका उमेदवाराला कार्यालयात किंवा नेत्याच्या घरी बोलावून एबी फॉर्म दिले जात होते. हे समजताच इच्छुक उमेदवारांनी तिथे गर्दी केली आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक प्रभागांमध्ये बाहेरच्या प्रभागातील उमेदवार दिल्याची तक्रार केली जात आहे. परिणामी भाजपमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सुद्धा दिले आहेत. आता या सर्व नाराजांना समजावून पक्षकार्यात सक्रिय करणे, तसेच ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांनाही समजावणे हे आव्हान भाजप नेतृत्वासमोर राहणार आहे. नागपुरात भाजपने ७० टक्के जुन्या नगरसेवकांना घरी बसवले असून तिथे तरुणाईला संधी दिल्याचे दिसून आले आहे. काँग्रेसने देखील अनेक जुन्या दिग्गजांना घरी बसवले आहे. त्यामुळे आता अनेक नवखे चेहरे महापालिकेत दिसू शकतील असे बोलले जात आहे. चंद्रपूर भाजपमध्ये जुने निष्ठावंत आमदार सुधीर मुनगंटीवार आणि पक्षात नव्याने आलेले आमदार किशोर जोरगेवार यांच्यातच संघर्ष सुरू असल्याचे दिसत आहे. त्याची चुणूक आधी नगर परिषद निवडणुकांमध्येच दिसून आली होती. आता पुन्हा तो संघर्ष सुरूच असल्याचे दिसते आहे. त्यामुळे इथे उमेदवारी वाटपातच बराच गोंधळ झाला होता. परिस्थिती आटोक्यात राहावी म्हणून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुलढाण्याचे आमदार चैनसुख संचेती आणि गडचिरोलीचे माजी खासदार अशोक नेते यांना निरीक्षक म्हणून नेमले होते. मात्र या दोघांना देखील परिस्थिती आवरणे कठीण झाले होते असे बोलले गेले. या गोंधळात चंद्रपूर भाजप जिल्हाध्यक्षांनी प्रदेशाकडून आलेल्या यादीत फेरफार करून आपल्या मर्जीतील बारा उमेदवारांना एबी फॉर्म दिले. त्यामुळे देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी प्रदेशाध्यक्षांनी जिल्हा अध्यक्षांनाच पदावरून हटवल्यावर आता परिस्थिती निवळली असल्याचे बोलले जात आहे. अर्थात त्याचाही प्रचारावर परिणाम होऊ शकतो. अमरावती आणि अकोल्यातही काही परिस्थिती वेगळी नाही. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना सर्वच पक्षातील बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावे यासाठी पक्ष नेतृत्व त्यांची मनधरणी करताना दिसत आहे. त्यात ठिकठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असल्याचेही दिसून आले आहे. नागपुरात हजारी पहाड परिसरात भाजपच्या एका बंडखोर उमेदवाराने उमेदवारी मागे घेऊ नये यासाठी त्याच्या समर्थकांनी त्याला घरात कोंडून ठेवल्याचेही आढळून आले आहे. या उमेदवाराला समजावण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे निष्ठावंत आमदार परिणय फुके तिथे पोहोचले. मात्र त्यांनाही या उमेदवारापर्यंत पोहोचू दिले जात नसल्याची ही माहिती आहे.

आज अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर चारही महापालिकांमध्ये निवडणुकांचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर प्रचाराला सुरुवात होईल. प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक दिग्गज विदर्भ पिंजून काढतील अशी माहिती आहे. हा प्रचार १३ जानेवारीपर्यंत चालणार आहे. तोवर सर्वच उमेदवार आपापल्या प्रभागात फिरून रात्रीचा दिवस करतील आणि आपला विजय निश्चित करण्याचा प्रयत्न करतील. १५ जानेवारीला मतदान आटोपले की १६ जानेवारीला संक्रांतीच्या मुहूर्तावर कोणाला तीळगूळ मिळणार आणि कोणाची पतंग काढली जाणार हे निश्चित होईल.

Comments
Add Comment