Monday, January 5, 2026

भारतात वर्षभरात १६६ वाघांचा मृत्यू

भारतात वर्षभरात १६६ वाघांचा मृत्यू

३१ बछड्यांचा समावेश

नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील जवळपास तीन-चतुर्थांश वाघांचे घर असलेल्या भारतात, २०२५ मध्ये तब्बल १६६ वाघांचा मृत्यू झाला. २०२४ च्या तुलनेत ही संख्या ४० ने वाढली आहे. २०२४ जेव्हा १२६ मृत्यूंची नोंद झाली होती. अधिवासावरील दबाव, प्रादेशिक स्पर्धा आणि संवर्धनातील आव्हाने यांसारख्या समस्यांबाबत नवीन चिंता निर्माण झाली आहे.

मध्यप्रदेशात सर्वाधिक ५५ मृत्यूंची नोंद झाली, तर इतर प्रमुख मृत्यू महाराष्ट्र ४०, केरळ १३ आणि आसाम १२ वाघांचे मृत्यू नोंदवले गेले. देशभरात मृत्यू झालेल्या एकूण वाघांपैकी ३१ बछडे होते. यापैकी बहुतेक मृत्यूंमागे प्रादेशिक संघर्ष हे एक प्रमुख कारण म्हणून समोर येत आहे. जागेच्या कमतरतेमुळे होणारी प्रादेशिक भांडणे हे वाघांच्या मृत्यूमागील प्रमुख कारणांपैकी एक आहे.

विशेषतः  मध्यप्रदेशात गेल्या दशकात वाघांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली आहे. राज्यातील वाघांच्या संख्येत २०१४ पासून २०२२ पर्यंत ७० टक्क्यांनी वाढ झाली. या जलद वाढीमुळे स्पर्धा तीव्र झाली आहे. २०२५ मधील पहिला वाघाचा मृत्यू २ जानेवारीला महाराष्ट्रातील ब्रह्मपुरी वनविभागात नोंदवला गेला, जिथे एका प्रौढ नर वाघाचा मृतदेह आढळला. त्यानंतर, तीन दिवसांनी मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात एका प्रौढ मादी वाघाचा मृत्यू झाला.

वाघ संवर्धन प्रकल्पांना जगभरात मान्यता

वाघाच्या मृत्यूची शेवटची नोंद २८ डिसेंबरला मध्यप्रदेशातील उत्तर सागर येथे आढळलेल्या एका प्रौढ नर वाघाच्या स्वरूपात झाली. बहूतांश मृत्यू हे संरक्षित क्षेत्राव्यतिरिक्त बाहेर झाले आहेत तर अनेक मृत्यू हे संशयास्पद, शिकार यातून झाले आहेत. वन्यजीवांसाठी असणारे कॉरिडॉर विकासात्मक प्रकल्पांमुळे तुटत आहेत आणि मानवी वस्ती असलेल्या अधिवासांमुळे त्यांच्या मुक्त हालचालींवरही मर्यादा येत आहेत. भारतातील वाघ संवर्धन प्रकल्पांना जगभरात ओळख आणि मान्यता मिळाली आहे. २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त झालेल्या शेवटच्या अधिकृत अखिल भारतीय व्याघ्रगणनेनुसार, भारतातील वाघांची संख्या २०१८ मधील २,९६७ वरून २०२२ मध्ये ३,६८२ पर्यंत वाढली आहे. भारत जगभरातील एकूण वाघांच्या लोकसंख्येपैकी जवळपास ७५ टक्के वाघांचे संरक्षण करतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा