नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडूनही संवाद; प्रमुख नेत्यांकडून बंडखोरांशी वाटाघाटी
मुंबई : महापालिका निवडणुकांसाठी दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस आहे. राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसोबतच बंडखोर व अपक्षांना दुपारी ३ वाजेपर्यंत आपले उमेदवारी अर्ज मागे घेता घेतील. त्यानंतर, राज्यातील सर्व २९ महापालिकांतील राजकीय लढतींचे चित्र स्पष्ट होईल. अनेक ठिकाणी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात नाराजांच्या बंडखोरीमुळे वातावरण तापलेले आहे. काही ठिकाणी मित्रपक्षाकडून बंडखोरी झालेली आहे. या सर्व ठिकाणी मनधरणीचे प्रयोग सुरू आहेत. स्थानिक नेत्यांसह सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांनी नाराजांशी संवाद साधत असंतोषाला आवर घालण्याचा प्रयत्न चालविला आहे.
सत्ताधारी व विरोधी पक्षांनाही मोठ्या प्रमाणावर नाराजीचा व बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे नाराजांची संख्याही मोठी आहे. अनेक महापालिकेत नाराजांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरले. नाराजांची समजूत काढण्यासाठी तसेच बंडखोरांचे समाधान करण्यासाठी ऑपरेशन मनधरणी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाच्या महापालिकांतील नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्यातील नेत्यांवर सोपविली आहे.
मुंबईत भाजपला तीन माजी नगरसेवकांसह जवळपास सात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. या सर्वांची समजूत काढण्यासाठी मंत्री आशीष शेलार व मुंबई अध्यक्ष अमीत साटम हे प्रत्येक बंडखोराची प्रत्यक्ष भेट घेत आहेत. आतापर्यंत यापैकी एकाच बंडखोराने आपली तलवार म्यान केली असली तरी शुक्रवारी बहुतांश ठिकाणचा असंतोष दूर झालेला असेल, असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकांतील नाराजांची समजूत काढण्याची जबाबदारी स्वत: भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उचलली आहे. त्यांच्यासोबत संदीप लेले, संजय केळकर, निरंजन डावखरे या नेत्यांनीही बंडखोरांशी संवाद चालविला आहे. नवी मुंबईत भाजपच्या तिकीट वाटपात मंत्री गणेश नाईक यांचे वर्चस्व दिसले. आमदार मंदा म्हात्रे गटाला डावलण्यात आल्याचा आरोप करत मोठी बंडखोरी झाली आहे. इथे पक्षात वरिष्ठ पातळीवरून चर्चा सुरू असल्याचे समजते.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बंडखोरांची समजूत काढण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील पुढे सरसावले आहेत, तर नाशिकमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे बंडखोरांची समजून काढत आहेत. सोलापूरची जबाबदारी मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे आहे. छत्रपती संभाजीनगरमधील संतप्त प्रतिक्रिया राज्यभरात चर्चिली गेली. येथे माजी खासदार भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांच्यासह स्थानिक भाजप आमदारांना बंडखोरांशी चर्चा करून त्यांच्या भावना समजून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर, नागपूरमध्ये महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तळ ठोकला आहे. शिवाय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही आधार घेतला जात आहे.
राज्यातील २९ महापालिकांमधील २ हजार ८६९ जागांसाठी ३३ हजार ६०६ अर्ज दाखल झाले. या अर्जांची बुधवारी छाननी झाली. यात प्रमुख पक्षाच्या काही उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. आता शुक्रवारी दुपारी ३ पर्यंत अर्ज माघारी घेण्याची वेळ दिली आहे.
स्वतः मुख्यमंत्री मैदानात
माघार घेण्याच्या मनस्थितीत नसलेल्या तसेच प्रभावशाली बंडखोरांशी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवाद साधत आहेत. वर्षानुवर्षे पक्ष कार्याला वाहिलेल्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत आहेत. पक्षनिष्ठा वाया जाणार नसल्याची हमी स्वतः मुख्यमंत्री देत आहेत. पक्ष भविष्यात आपली दखल घेईल, काहींना महापालिकांमध्ये स्वीकृत सदस्य, तसेच राज्य आणि जिल्हा स्तरावरील समित्यांमध्ये सामावून घेत समाधान करण्याचा शब्द दिला जात आहे. बंडखोरांनी आपल्या बंडाचे निशाण मागे घ्यावे, यासाठी प्रयत्न होत आहे. त्यापेक्षाही निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ते डावलले जात असल्याची भावना तयार होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यभरात जवळपास बारा प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांची समजूत घातल्याचे समजते.






