काँग्रेस जिल्हा प्रवक्त्याचा राजीनामा; ‘निर्भय भारत आघाडी’ मैदानात
भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीतील जागावाटपावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला आहे. उबाठा गटाला सर्वाधिक जागा, काँग्रेसकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना उमेदवारी, मनसेची अवघ्या १२ जागांवर बोळवण आणि मागील निवडणुकीत खातेही न उघडू शकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला दिलेल्या १५ जागा—या कारणांमुळे आघाडीत अंतर्गत वाद चिघळले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे मुख्य जिल्हा प्रवक्ता प्रकाश नागणे यांनी राजीनामा देण्याचे जाहीर संकेत दिले असून, सर्व नाराज व बंडखोर उमेदवारांना एकत्र आणत ‘निर्भय भारत आघाडी’ स्थापन केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर गंभीर राजकीय आव्हान उभे राहिल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
भाजपला प्रभावी टक्कर देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. जनाधार, उमेदवारांचे कार्य आणि लोकप्रियता लक्षात घेऊन जागावाटपाचे सूत्र ठरवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र उबाठा (७५), मनसे (२५) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) (४५) अशा मोठ्या मागण्यांमुळे समन्वय साधण्यात अडचणी निर्माण झाल्या.
अंतिम जागावाटपात सर्वच घटक पक्षांना अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याने नाराजी वाढली आहे. त्यातच भाजप-शिवसेना युती न झाल्याने काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात छुपी युती होण्याची शक्यता असल्याची भीती काही घटक पक्षांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेने काही प्रभागांत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळेही संशय अधिक बळावला आहे.नागणे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. मात्र त्यांच्या प्रभागात एकाच कुटुंबातील दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आल्याने नागणे यांना अधिकृत उमेदवारी मिळाली नाही. या प्रकारामुळे नाराज नागणे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, काँग्रेसचा राजीनामा देत निर्भय भारत सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नाराज व बंडखोर उमेदवारांची स्वतंत्र आघाडी उभारण्याचा निर्णय घेतला आहे.






