Friday, January 2, 2026

बुलेट ट्रेनच्या मुहूर्ताची घोषणा!

बुलेट ट्रेनच्या मुहूर्ताची घोषणा!

१५ ऑगस्ट २०२७ ला धावणार, रेल्वे मंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरवण्यात आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशाची पहिली बुलेट ट्रेनची सेवा १५ ऑगस्ट २०२७ पासून सुरू होईल, अशी घोषणा केली आहे.

बुलेट ट्रेनमुळे मुंबईहून अहमदाबाद हे अंतर २ तास ७ मिनिटांत कापता येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दर ३० मिनिटांनी ट्रेन पकडता येणार आहे. या प्रकल्पासाठी बीकेसी व शिळफाटादरम्यानच्या २१ किमी लांबीचा बोगदा तयार करण्यात येत आहे. या बोगद्यापैकी ५ किमी लांबीचा बोगदा शिळफाटा व घणसोलीदरम्यान न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड वापरून बांधला जात आहे, तर उर्वरित १६ किमी लांबीचा बोगदा टनेल बोरिंग मशीन वापरून बांधला जात आहे.

व्यापार, गुंतवणूक, पर्यटनाला चालना मिळणार

या प्रकल्पात जपानचे शिंकान्सेन हाय-स्पीड ट्रेन तंत्रज्ञान वापरले जात आहे. या मार्गावरील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मुंबई बुलेट ट्रेन स्टेशन हे मुंबई-अहमदाबाद एचएसआर कॉरिडॉरवरील एकमेव भूमिगत स्टेशन आहे. यासाठी जमिनीखाली ३२.५० मीटर (अंदाजे १०६ फूट) खोलीपर्यंत खोदकाम केले जात असून, या स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि सर्व्हिस फ्लोअरसह तीन मजले असतील. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई-अहमदाबादमधील व्यापार, गुंतवणूक व पर्यटनाला चालना मिळणार आहे.

३२०च्या गतीने ५०८ किमी अंतर २ तास ७ मिनिटात पूर्ण होणार

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माहितीनुसार, हा बुलेट ट्रेन प्रोजेक्ट ५०८ किमी लांबीचा आहे. यापैकी ३०८ किमीचा भाग हा गुजरातमध्ये आहे, तर १५६ किमीचा भाग हा महाराष्ट्रामध्ये, तर ४ किमीचा भाग हा दादरा नगर हवेली इथे असणार आहे. अहमदाबाद-बुलेट ट्रेनच्या मार्गावर १२ स्टेशन असणार आहेत. या मार्गाचे पहिले स्टेशन हे साबरमती राहील आणि शेवटचे स्टेशन महाराष्ट्रातील मुंबई असेल.

Comments
Add Comment