सोलन : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नालागढ पोलीस स्टेशनच्या परिसरात असलेल्या एका गल्लीत अचानक भीषण स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, त्याचा आवाज अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आला. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.
आर्मी हॉस्पिटलचे नुकसान
#HimachalPradesh A loud blast was reported near the wall of a police station in Nalagarh, Solan district of Himachal Pradesh. The explosion shattered windowpanes of the police station, ECHS polyclinic, and market committee building. Area sealed; probe underway. pic.twitter.com/nLlNN5YasO
— Smriti Sharma (@SmritiSharma_) January 1, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ झाला. स्फोटाच्या तीव्रतेमुळे परिसरातील अनेक इमारतींना हादरे बसले असून नजीकच्या लष्करी रुग्णालयाचे (आर्मी हॉस्पिटल) मोठे नुकसान झाले आहे. रुग्णालयाच्या आणि परिसरातील घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटून रस्त्यावर पडल्या आहेत. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले.
जीवितहानी टळली, पोलिसांचा वेढा
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही सर्वात मोठी दिलासादायक बाब आहे. स्फोटाची माहिती मिळताच बद्दीचे पोलीस अधीक्षक (SP) विनोद धीमान यांच्यासह पोलिसांचे मोठे पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली असून नागरिकांना घटनास्थळी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
स्फोटाचे गूढ कायम
हा स्फोट नेमका कशामुळे झाला? हा घातपाताचा प्रयत्न होता की इतर काही तांत्रिक कारण, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. फॉरेन्सिक टीम स्फोटाच्या ठिकाणाहून नमुने गोळा करत असून घातपाताची शक्यताही तपासली जात आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेने प्रशासनाची झोप उडवली असून परिसरात पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.






