शिवसेनेकडून नाराजी सोडवण्याचा प्रयत्न
ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस रंगला. अनेक पक्षांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याचा ताण वाढला. शेवटच्या टप्प्यावरच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते एकनाथ शिंदे यांनी ठाणेचे खासदार नरेश म्हस्के यांना मोठा झटका दिला. ठामपात नरेश म्हस्के यांचा मुलगा आशुतोष म्हस्के इच्छुक होता. पिता-पुत्रांनी या उमेदवारीसाठी पूर्ण तयारी केली होती आणि अपेक्षा होती की निकटवर्तीय असल्यामुळे मुलाला तिकीट मिळेल. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी अचानक निर्णय घेत मुलाचे तिकीट रद्द केले.
म्हस्के यांनी स्वतः मोठा प्रयत्न केला, पण त्यांच्या अपेक्षेनुसार परिणाम साध्य झाला नाही. ठाण्यात इतर अनेक दिग्गज नगरसेवकांचेही तिकीट रद्द करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शिवसेना (शिंदे गट)मध्ये संताप वाढला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः ठाण्यात दाखल झाले आणि आनंदमठ परिसरात नाराज उमेदवारांना समजूत घालत पक्षाच्या धोरणांचा अर्थ स्पष्ट केला. त्यांनी अनेक नाराज दिग्गज नगरसेवकांना शांत केले आणि पक्षातील एकजूट कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. या घडामोडी ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या रणनीतीवर परिणाम करणार आहेत, असे राजकीय विश्लेषक म्हणतात.
शिवसेना (शिंदे गट)-भाजपमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी:
शिवसेनेने (शिंदे गट) साधना जोशी, एकनाथ भोईर, पुर्वेश सरनाईक, आशा डोंगरे, मधुकर पावशे, भूषण भोईर, रुचिता मोरे, मनिषा कांबळे, प्रभा बोरिटकर, राजेंद्र साप्ते, मंगल कळंबे, प्रियंका पाटील आणि सुनिता मुंडे यांना उमेदवारी नाकारली. काही प्रभागांमध्ये कुटुंबातील सदस्यांना संधी देण्यात आली; रुचिता मोरेच्या जागी पती राजेश मोरे, एकनाथ भोईरच्या जागी सून यज्ञा भोईर, भूषण भोईरच्या जागी पत्नी सपना भोईर यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपकडून माजी नगरसेविका कविता पाटील, केवलादेवी यादव, सुवर्णा कांबळे आणि दीपा गावंड यांचे तिकीट कापण्यात आले आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली गेली.
तिकीट नाकारल्यामुळे बंडखोरी:
टेंभीनाका प्रभागातून शिंदेसेनेच्या माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर निखिल बडजुडे आणि विकास दाभाडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. प्रभाग क्रमांक १५ मध्ये उमेदवारी नाकारल्याने भाजपाचे माजी नगरसेवक राजकुमार यादव, वर्षा पाटील आणि शिंदेसेनेचे महेंद्र सोडारी यांनी आधी राष्ट्रवादीत प्रवेश केला, नंतर काही तासांत बहुजन समाजवादी पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला. याच प्रभागात बबुल शेख आणि दशरथ यादव यांनी समाजवादी पक्षातून अर्ज दाखल केला, तर प्रभाग क्रमांक ३ मध्ये भूषण भोईर आणि मधुकर पावशे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
जखमी महिला उमेदवाराचा रुग्णवाहिकेतून येत अर्ज दाखल :
ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक २६ (शैलेशनगर, मुंब्रा) मधून राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाने संगिता दवणे यांना उमेदवारी दिली आहे. सोमवारी सकाळी घरात जेवण बनवताना कुकरचा स्फोट होऊन त्या गंभीर जखमी झाल्या. तरीही मंगळवारी रुग्णवाहिकेतून पालिकेच्या प्रभाग समितीत येऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रभागात राष्ट्रवादी पक्षाची मोठी ताकद असून, गेल्या निवडणुकीत दिपाली भगत (शरद पवार गट) यांना हरवण्यात संगिता दवणे यांना यश मिळाले होते. जखमी अवस्थेत अर्ज दाखल करूनही त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थितीत आपला दावा सिद्ध केला.
विद्यमान नगरसेवक नाराज:
ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेने (शिंदे गट) १४ विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारून नव्या चेहऱ्यांना संधी दिली, तर भाजपने चार विद्यमान नगरसेवकांचा तिकीट कापले. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आणि काहींनी अपक्ष अर्ज दाखल केले. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर मंगळवारी (३० डिसेंबर) पहाटेपासून अधिकृत उमेदवारी अर्ज (एबी फॉर्म) देण्यास सुरुवात झाली. सोमवारी सायंकाळपासून इच्छुक उमेदवार आणि समर्थकांनी पक्ष कार्यालयांबाहेर ठिय्या मांडल्याचे दृश्य सून आले.






