Wednesday, December 31, 2025

पुतिन यांच्या घरावरील हल्ल्यानंतर रशियाकडून घातक ‘ओरेशनिक’ क्षेपणास्त्र तैनात

पुतिन यांच्या घरावरील हल्ल्यानंतर  रशियाकडून घातक ‘ओरेशनिक’ क्षेपणास्त्र तैनात

मास्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या अधिकृत निवासस्थानी ड्रोन हल्ला झाल्यानंतर रशियाने अत्यंत गंभीर आणि चकीत करणारे पाऊल उचलले आहे. रशियन सैन्याने पहिल्यांदाच अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या ‘ओरेशनिक’ क्षेपणास्त्र प्रणालीला अॅक्टिव्ह सेवेत दाखल केले आहे. या निर्णयामुळे युक्रेनवरील मोठ्या आणि विनाशकारी हल्ल्याचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी सांगितले केले की, अण्वस्त्र-सक्षम ओरेशनिक क्षेपणास्त्र प्रणाली आता अधिकृतपणे सक्रिय सेवेत सामील झाली आहे. विशेष बाब म्हणजे, याच काळात युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी सुरू असलेल्या शांतता चर्चांमध्ये तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मंत्रालयानुसार, ओरेशनिक क्षेपणास्त्रे बेलारूसमध्ये तैनात करण्यात आली आहेत. या निमित्ताने लष्कराकडून एक संक्षिप्त समारंभही आयोजित करण्यात आला. मात्र, किती क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत, याचा तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. पुतिन यांच्या अधिकृत निवासावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर अवघ्या एका दिवसातच ही तैनाती करण्यात आली आहे. या हल्ल्याची माहिती पुतिन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिली होती.

Comments
Add Comment