कर्नल (नि.) अनिल आठल्ये (आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक)
काळ सरकला ; पण त्या काळाने जाता जाता आपल्या पदरात काय टाकले याचा लेखाजोखा घेण्याचा हा प्रयत्न -जागतिक अशांतता आणि वारंवार उफाळून येणाऱ्या दहशतवादी प्रवृत्तींच्या शृंखलांनी सरत्या वर्षाला जखडले होते. युद्ध आणि युद्धजन्य परिस्थितीचे चटके अनेक निरपराध्यांनी सोसले. कित्येक निरपराध जीव होरपळले. या सगळ्यांमागे घड्याळाचे काटे उलटे फिरवू इच्छिणाऱ्या राष्ट्रनेत्यांच्या सदोष ध्येयधोरणांचा आणि कल्पनांचा जसा वाटा होता; तसाच सुडाने पेटलेल्या वा पेटवलेल्या जनभावनेचाही होता.
दोन वर्षांपूर्वी रशियाच्या दौऱ्यावर असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमिर पुतिन यांना सध्याचे युग युद्धाचे नसल्याचा सल्ला दिला होता. तेव्हा त्यांचा रोख रशियाने काही महिन्यांपूर्वीच युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या दिशेने होता. आता एका दृष्टिकोनातून पाहिले तर पंतप्रधानांचे हे भाकीत चुकीचे म्हणता येईल, कारण गेल्या दोन-चार वर्षांपासून अनेक देशांमध्ये सशस्त्र हल्ले आणि चकमकी सुरू आहेत. म्हणजेच सद्यस्थितीत पंतप्रधानांना अभिप्रेत असणारी शांतता कोठेही दिसत नाही. अर्थात असे असले तरी दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहता हे सत्यही समोर येते की, या युगात लष्करी सामर्थ्याद्वारे कोणतेही प्रश्न सुटणारही नाहीत. त्यामुळेच लष्करी बळाचा वापर करण्याचा पर्याय कोणत्याही देशाने अवलंबू नये. वर्षाच्या अखेरीस दिसणारी जागतिक परिस्थिती पाहिली तर हेच चित्र स्पष्ट दिसते.
गेल्या तीन वर्षांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे; परंतु त्यात कोणत्याही एका बाजूला निर्भेळ यश प्राप्त झालेले नाही. मध्यपूर्वेवर नजर टाकली तर दोन वर्षांपूर्वी ‘हमास’ या संघटनेने इस्त्रायलवर अचानक हल्ला केला होता. या अचानक झालेल्या हल्ल्यात सुरुवातीच्या एक-दोन दिवसांमध्ये इस्त्रायलचे हजारो नागरिक मारले गेले. नागरिकांना शेकडोंच्या संख्येने बंधक बनवून हमासने गाझामध्ये डांबून ठेवले. सुरुवातीच्या या हल्ल्यातून सावरल्यानंतर इस्त्रायलने प्रत्युत्तरादाखल संपूर्ण गाझावर भयंकर हवाई हल्ले करून तेथील अनेक इमारती, आरोग्य केंद्रे, यंत्रणा जवळपास भुईसपाट केल्या. परिणामस्वरूप, लाखो पॅलेस्टिनी लोकांना घरदार सोडून उघड्यावर राहावे लागले. या हल्ल्यात तीस-चाळीस हजार नागरिकांना प्राण गमवावे लागले.युक्रेन-रशिया युद्धाप्रमाणेच या संघर्षातदेखील कोणत्याही एका बाजूला निर्णायक विजय मिळालेला नाही. मनुष्यबळाची एवढी हानी होऊनदेखील हमास ही संघटना आधी होती तेवढीच मजबूत आहे. पॅलेस्टिनी नागरिकांच्या नरसंहारामुळे जगभर जनमत इस्त्रायलच्या विरोधात झाले. वर्षअखेरीस या घटनेकडे तटस्थपणे पाहिले असता स्पष्ट दिसते की, हमास आणि इस्त्रायल दोघांचेही युद्धाबद्दलचे आडाखे चुकले आहेत. इस्त्रायल आणि हमासमधील संघर्ष त्या दोन देशांपुरता मर्यादित न राहता लेबनॉन आणि नंतर इराणपर्यंतही पोहोचला. काही महिन्यांपूर्वी मध्यपूर्वेतील अशांततेचा फायदा घेत अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवरदेखील हवाई हल्ले केले. त्यांचा या हल्ल्यामागील उद्देश इराणची अण्वस्त्रे बनवण्याची क्षमता नष्ट करणे हा होता. मात्र आज सहा महिन्यांनंतरदेखील अमेरिका या उद्दिष्टात यशस्वी झाल्याचे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. इराणच्या अण्वस्त्र बनवण्याच्या क्षमतेला धक्का अवश्य बसला; परंतु ती पूर्णपणे नष्ट झाली, असे आज तरी वाटत नाही. या जागतिक पार्श्वभूमीवर मे महिन्यामध्ये भारतात काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी एक भ्याड हल्ला करून पंचवीस हिंदू पर्यटकांची हत्या केली. या आधीदेखील काही वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये उरी आणि पुलवामामध्ये दहशतवादी हल्ले झाले असता भारताने उत्तरादाखल पाकिस्तानवर सर्जिकल स्टाईक आणि हवाई हल्ले केले होते. म्हणजेच पहलगामच्या घटनेनंतर भारत स्वस्थ बसणार नाही, याची पाकिस्तानला जाणीव असायला हवी होती. त्यानुसार पहलगामच्या घटनेनंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने ७ मे रोजी लाहोर आणि बहावलपूर येथील दहशतवादी मुख्यालयांवर दहशतवादी हल्ले केले. १९७१ च्या युद्धानंतर पाकिस्तानचे मर्मस्थान असणाऱ्या पंजाब प्रांतात प्रथमच अशा प्रकारचे हल्ले झाले. त्यानंतर ९ आणि १० मे रोजी भारताने आपली ब्रम्होस क्षेपणास्त्रे वापरून पाकिस्तानची एक तृतियांश हवाई क्षमता नष्ट केली. हे युद्ध आणखी काही काळ सुरू राहिले असते तर पाकिस्तानकडून अण्वस्त्रांचा वापर केला जाण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे भारताने हात आखडता घेऊन पाकिस्तानची शस्त्रसंधीची विनंती मान्य केली. या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांना अणुयुद्ध होऊ नये असे वाटत असल्याचे दिसते. त्यामुळेच ही शस्त्रसंधी झाली असे म्हणता येईल. वर्षअखेरीस या घटनेचे स्मरण होणे अनिवार्य आहे. दुसरीकडे, मध्यपूर्वेतील इस्त्रायलच्या बाॅम्बहल्ल्यांमुळे पाश्चिमात्य देशात त्या देशाविरुद्ध जनमत तयार झाले. त्याचा फायदा घेऊन पश्चिमेच्या देशांमध्ये स्थायिक झालेल्या मुसलमानांनी अनेकदा इस्त्रायलच्या विरोधात निदर्शने केली. मग अशा प्रकारच्या तणावाच्या परिस्थितीतच काही माथेफिरू अतिरेक्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये आपला सण साजरा करणाऱ्या ज्यू धर्मियांवर दहशतवादी हल्ला केला. त्यात १५-१६ नागरिक मारले गेले. वर्षाची अखेर होत असताना या घटनेने दहशतवादाचा क्रूर चेहरा नव्याने जगासमोर आणला. थोडक्यात बघायचे, तर सध्या जगभर एक प्रकारे अराजकाची स्थिती निर्माण झाली आहे. अर्थातच याला काही मूलभूत कारणे आहेत. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत संघ या दोन लष्करीदृष्ट्या तुल्यबळ शक्ती होत्या. त्यामुळे कोणतेही स्थानिक युद्ध हाताबाहेर जात असल्याचे दिसले, तर त्यातून जागतिक अणुयुद्धाची भीती निर्माण होत असे. या दोन शक्तीमध्ये अणुयुद्ध झाल्यास संपूर्ण पृथ्वीवरील जीवन नष्ट होण्याची भीती असे. या जागतिक अणुयुद्धाच्या भीतीमुळेच स्थानिक युद्धांवरही एक प्रकारचा वचक होता आणि दोन्ही महाशक्ती एकत्र येऊन युद्ध करणाऱ्या छोट्या देशांना शस्त्रसंधी करण्यास भाग पाडत असत; परंतु १९८२ मध्ये सोव्हिएत संघाचे विघटन झाले. त्यातून निर्माण झालेला रशिया अमेरिकेला कधीच तुल्यबळ नव्हता. या दरम्यान तिसरी महाशक्ती म्हणून चीनचा उदय झाला असला तरी हा देश आर्थिक महासत्ता आहे. लष्करी क्षेत्रात मात्र चीन अमेरिकेच्या बराच मागे आहे. नव्वदच्या दशकात काही काळापुरती अमेरिका ही एकच महाशक्ती जगात होती; परंतु कालांतराने म्हणजेच एकविसावे शतक उजाडता अमेरिकेचा लष्करी आणि आर्थिक प्रभाव कमी होऊ लागला. अफगाणिस्तानसारख्या छोट्या देशामध्ये वीस वर्षे लढून तसेच हजारो सैनिक गमावूनही अमेरिकेला तालिबानवर विजय मिळवता आला नाही. अखेरीस दोन वर्षांपूर्वी अमेरिकेला अफगाणिस्तानमधून लाजिरवाण्या प्रकारे माघार घ्यावी लागली होती. बदलत्या काळातले हे वास्तवही लक्षात घेण्याजोगे आहे. संरक्षणदृष्ट्या बघता गेल्या काही वर्षांमध्ये मानवरहित विमानांचे (ड्रोन) तंत्रज्ञान वेगाने विकसित झाले आहे. त्यामुळे आता आधुनिक युद्धाचा चेहरा-मोहरा बदलला आहे. मध्य आशियातील येमेनसारखा मागासलेला देशही ड्रोन्सचा वापर करून मध्यपूर्वेतील समुद्रात व्यापारी जहाजांवर राजरोस हल्ले करत आहे. अशा प्रकारे आता जागतिक व्यापारालाही स्थानिक युद्धांची झळ बसू लागली आहे. हा संदर्भही दखलपात्र म्हणावा लागेल. या परिस्थितीत ‘दुष्काळात तेरावा महिना’ असावा, तसे डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि मावळत्या वर्षाच्या सुरुवातीलाच सर्व जागतिक करार धुडकावून लावत जगातील सर्व देशांशी एक प्रकारे आर्थिक युद्ध सुरू केले. स्वाभाविकच भारतालाही त्याची झळ बसली. अमेरिकेच्या या धोरणांचा फटका सहन करणारा भारत हा एकमेव देश नाही. त्याच्याबरोबर सर्व युरोपीय देश आणि दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, आफ्रिकेतील दक्षिण आफ्रिका इत्यादी देशांनाही याची झळ पोहोचली आहे. थोडक्यात, आज आर्थिक आघाडीवर अमेरिका विरुद्ध बाकीचे जग असे चित्र निर्माण झाले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर एक काळ अमेरिका आर्थिकदृष्ट्या संपूर्ण जगाला पुरून उरणारा देश होता. पण आजची स्थिती वेगळी आहे. आज अर्थव्यवस्थेबाबत चीन अमेरिकेचा तुल्यबळ आहे. लष्करी सामर्थ्याच्या दृष्टीनेही अमेरिकेला शह देऊ शकणाऱ्या राष्ट्रांचा गट ‘ब्रिक्स’च्या नावाने पुढे येत आहे. यात भारत, रशिया, चीन, ब्राझील इत्यादी देशांचा समावेश आहे. थोडक्यात सांगायचे तर, गेल्या शतकात करू शकत होता तशी धोरणे आणि दंडेली अमेरिका करू शकेल अशी आजची स्थिती नाही. पण अमेरिका हे विचारात घेत नाही. विचार करता कळते की, जगातील सर्वच संघर्ष त्या त्या राष्ट्रांची शक्ती आणि उद्दिष्ट यांचे प्रमाण व्यस्त असल्यामुळे होत आहेत. आज जगातील सर्व महत्त्वाच्या देशांचे (यात भारतही सहभागी आहे) नेतृत्व घड्याळाचे काटे फिरवण्याची इच्छा ठेवून आहे. ट्रम्प यांना १९५० च्या दशकातील अमेरिकेचे वर्चस्व परत आणायचे आहे. म्हणूनच मग त्याला ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ हे गोंडस नाव दिले जात आहे. आज जागतिक परिस्थिती आमूलाग्र बदलली आहे. इकडे रशियामध्ये राष्ट्रपती पुतीन यांना सोव्हिएत संघाप्रमाणे रशिया हा पुन्हा एक महाशक्ती म्हणून उभा करायचा आहे. सोव्हिएत संघाचे विघटन झाल्यानंतर उर्वरित रशियाची साधनसामग्री, मनुष्यबळ आणि आर्थिक सामर्थ्य केवळ एक तृतियांश राहिले आहे. चीनमध्ये शी जिनपिंग यांना हजार वर्षांपूर्वीचे जुने चिनी साम्राज्य उभे करायचे आहे. म्हणूनच आज चीन भारताच्या सीमाभागांवर तसेच दक्षिण चीन समुद्रावर दावा करत आहे. म्हणजेच पुतिन आणि ट्रम्प यांना बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेता येत नाही. तीच गत शी जिनपिंग यांचीही आहे. भारतामध्ये मोदींना रामराज्य परत आणायचे आहे; परंतु मध्यंतरीच्या हजार वर्षांच्या काळामध्ये देशाच्या सामाजिक परिस्थितीमध्ये झालेला आमूलाग्र बदल लक्षात घेता भारत हे हिंदू बहुसंख्य राष्ट्र असले तरी हिंदू राष्ट्र कधीच होऊ शकत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे देशाच्या २० टक्के लोकसंख्येचा या कल्पनेला विरोध आहे. अशाप्रकारे हे उद्दिष्टदेखील सद्यस्थितीत तसेच भविष्यकाळातही साध्य न होणारे आहे. जागतिक नेतृत्वांची ही विचारसरणी जगातील अस्थिरतेच्या तसेच अशांततेच्या मुळाशी आहे. येत्या वर्षात यात काही बदल होण्याची शक्यता दिसत नाही. पण विचारसरणी बाजूला ठेऊन जागतिक नेतृत्वाने यथार्थवाद आपलासा केला, तर मात्र येत्या काळात जगात शांतता नांदू शकते.





