Wednesday, December 31, 2025

नाशिकमध्ये एबी फॉर्म वाटपावरून गोंधळ

नाशिकमध्ये एबी फॉर्म वाटपावरून गोंधळ

शहराध्यक्षांच्या गाडीचा फिल्मी पाठलाग; अखेर पोलीस बंदोबस्तात एबी फॉर्मचे वितरण

मयूर बारागजे  सिडको : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी भाजपमध्ये एबी फॉर्मच्या वाटपावरून मोठा गोंधळ उडाला. एबी फॉर्म मिळविण्यासाठी इच्छुकांनी थेट भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या गाडीचा नाशिक–मुंबई महामार्गावर फिल्मी शैलीत पाठलाग केल्याने खळबळ उडाली. यावेळी केदार यांच्या गाडीत नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले व नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे उपस्थित होत्या.

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना सकाळी भाजपकडून एबी फॉर्मचे वाटप सुरू होते. एकूण १२२ जागांसाठी सुमारे १०७७ हून अधिक इच्छुक असल्याने कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी विल्होळी येथील एका फार्महाऊसवर फॉर्म वाटपाचे नियोजन करण्यात आले होते. ही माहिती मिळताच इच्छुकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. गर्दी वाढत गेल्याने फार्महाऊसचे मुख्य गेट बंद करण्यात आले. त्यामुळे संतप्त इच्छुकांनी गेट तोडून आत प्रवेश केला.

पोलीस बंदोबस्तात एबी फॉर्मचे वाटप

फार्महाऊसवर गोंधळ वाढल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यानंतर आमदार राहुल ढिकले व सीमा हिरे यांच्या उपस्थितीत एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले.

Comments
Add Comment