तिन्ही राजकीय पक्षांचे धोरण आज स्पष्ट होणार
विरार : महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार (दि. ३०) रोजी शेवटचा दिवस आहे. असे असतानाही बविआ, शिवसेना (उबाठा ) आणि काँग्रेस या राजकीय पक्षांची आघाडी झाल्याचा निर्णय झालेला नाही. अपेक्षित जागा न मिळणे आणि निवडणूक चिन्हावर एकमत न झाल्याने आघाडीच्या चर्चेतून बाहेर पडल्याचे उबाठा पालघर जिल्हा सरचिटणीस विलास पोतनीस यांनी जाहीर केले होते. मात्र रविवार आणि सोमवारीसुद्धा उबाठा आणि काँग्रेसच्या नेत्यांनी बविआच्या नेत्यांकडे आघाडी बाबत चर्चा केली. त्यामुळे आता आघाडी की स्वबळावर हा विषय मंगळवारीच स्पष्ट होणार आहे. वसई - विरार महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरिता केवळ एक दिवस शिल्लक असताना अजूनही शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि बविआ यांच्यातील आघाडीचा निर्णय झाला नाही. या ठिकाणी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती झाली आहे, तर बविआ, काँगेस, शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र येऊन आघाडी करण्याची तयारी चालवली होती. यासाठी या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या अनेक बैठका झाल्या. कोणत्या राजकीय पक्षाकडे किती जागा असतील यापासून सुरू झालेली चर्चा निवडणूक चिन्हावर आली. बहुजन विकास आघाडीने आपल्या पारंपरिक शिट्टी या चिन्हावरच आघाडीतील सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक लढवावी असा प्रस्ताव ठेवला. मनसे आणि काँग्रेस पक्षाने बविआ सोबत जाण्याचे निश्चित केले होते. मात्र चिन्ह आणि जागा याबाबतचा निर्णय काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी प्रदेश काँग्रेसवर सोपविला होता. उबाठाचे चिन्हावर आणि जागावाटपात एकमत झाले नाही. त्यामुळे त्यांनी आघाडीतून बाहेर पडल्याचे पोतनीस यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. त्यांच्या उमेदवारांनी स्वबळानुसार निवडणूक अर्ज सुद्धा दाखल केले आहेत. मनसे मात्र शिट्टी या चिन्हावर लढण्यास तयार आहे, तर दुसरीकडे पुन्हा एकदा उबाठा गटातर्फे बहुजन विकास आघाडीशी दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहे. सोमवारी उशिरापर्यंत याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे बविआचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी सांगितले. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा आघाडी आणि जागा वाटपाबाबत बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता अखेरच्या दिवशीच या तीन राजकीय पक्षांमधील आघाडी आणि जागा वाटपाचा तिढा सुटणार आहे हे स्पष्ट झालेले आहे.
भाजप सेना युतीच्या उमेदवारांबाबत गोपनीयता : भाजप आणि शिवसेना या महायुतीच्या कोणत्याही नेत्याकडून प्रत्यक्षात कोणता पक्ष किती जागा लढवत आहे हे अद्यापपर्यंत स्पष्ट केले नाही. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून निवडणूक रिंगणात उतरविण्यात येणाऱ्या उमेदवारांना खासगीमध्ये निरोप देण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी सतत तीन दिवस वसई-विरारमध्ये तळ ठोकून उमेदवारांच्या भेटी घेतल्या. तसेच नाराज असलेल्या इच्छुक उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे पंडित, जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांनी भाजपच्या उमेदवारांना ए फॉर्म दिले आहेत, तर उद्या दुपारी भाजप पदाधिकाऱ्यांकडूनच बी फार्म जोडले जाणार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुद्धा कोण आहेत ही बाब स्पष्ट झालेली नाही.






