Tuesday, December 30, 2025

जागोजागी बंडाचे झेंडे

जागोजागी बंडाचे झेंडे

नाराजांची समजूत घालताना पक्षश्रेष्ठींची दमछाक; उबाठा-मनसेत बंडोबांची संख्या सर्वाधिक

मुंबई : दीर्घकाळानंतर राज्यात महापालिका निवडणुका होत असल्याने सर्वच पक्षांत इच्छुक उमेदवारांची गर्दी होणे स्वाभाविक आहे; परंतु या गर्दीतील ‘दर्दीं’ना थोपवताना पक्षश्रेष्ठींची पुरती दमछाक होऊ लागली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या प्रमुख शहरांतील प्रभागांमध्ये अनेक वर्षांपासून मतदारसंघ बांधणी करणाऱ्या इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने अनेकजण बंडखोरीच्या पवित्र्यात आले आहेत. युती-आघाडीच्या राजकारणामुळे जागावाटपात काहींची तिकिटे कापली गेल्याने सर्वच पक्षांत नाराजीचे वातावरण आहे. विशेषतः उबाठा आणि राज ठाकरे-मनसेत बंडखोरीच्या घटना सर्वाधिक दिसत आहेत. मनसेच्या सरचिटणीस स्नेहल जाधव यांनी सोमवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. वॉर्ड क्रमांक १९२ मधून उमेदवारी जाहीर करताना विश्वासात घेतले नाही, अशी नाराजी व्यक्त करत त्यांनी हा निर्णय घेतला. स्नेहल जाधव यांनी १९९२ ते १९९७, १९९७ ते २००२ आणि २००२ ते २००७ अशा सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून काम केले होते. त्यानंतर २००७ ते २०१२ या काळात त्यांचे पती नगरसेवक निवडून आले. कुटुंबाने या वॉर्डमध्ये सलग तीन वेळा विजय मिळवला असतानाही यावेळी उमेदवारी नाकारल्याने त्या नाराज आहेत. याच वॉर्डवरून उबाठा गटातही बंडखोरीचे सत्र सुरू आहे. या प्रभागातून मनसेच्या यशवंत किल्लेदार यांना तिकीट मिळाल्याने, उबाठा गटाचे इच्छुक प्रकाश पाटणकर नाराज झाले असून, ते शिवसेनेत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे. भांडुपमधील वॉर्ड क्रमांक ११४ ठाकरे गटाला मिळाल्याने मनसेच्या माजी नगरसेविका अनिशा माजगावकर नाराज झाल्या आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली आहे. राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्या निर्णयावर ठाम आहेत. या प्रभागातून उबाठा गटाचे माजी आमदार रमेश कोरगावकर यांच्या पत्नीला उमेदवारी जाहीर झाली आहे.

मुंबईत भाजप १३७, शिवसेना ९० जागा लढणार

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचे सूत्र अखेर ठरले आहे. भाजप आणि शिवसेनेत दीर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाला असून, भाजप १३७ जागांवर तर शिवसेना ९० जागांवर लढवणार आहे. मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ जागांसाठी महायुती एकत्रितपणे लढत असून, भाजप आणि शिवसेना आपापल्या कोट्यातून मित्रपक्षांना काही जागा देणार असल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही आठवड्यांपासून जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच सुरू होती. सुरुवातीला भाजपने १५० हून अधिक जागांची मागणी केली होती, तर शिवसेनेने १०० च्या आसपास जागा हव्या असल्याचे सांगितले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पातळीवर झालेल्या बैठका आणि वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर हा तिढा सुटला. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखालील चर्चा यशस्वी ठरल्या. मंगळवारी एबी फॉर्मचे वाटप पूर्ण करून दोन्ही पक्षांचे उमेदवार नामनिर्देशन अर्ज दाखल करणार आहेत. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत ३० डिसेंबरपर्यंत आहे.

वरळीत उबाठाच्या खंद्या कार्यकर्त्याचा राजीनामा

वरळी विधानसभा मतदारसंघात उबाठा गटातील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे. वरळी कोळीवाड्यातील प्रभाग क्रमांक १९३ मधून हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी मिळाल्याने शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिला आहे. ते १७ वर्षांपासून पक्षात कार्यरत होते.

कल्याण - डोंबिवलीतही नाराजी

कल्याण–डोंबिवलीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि माजी सभागृह नेते कैलास शिंदे यांनी पक्षाकडे थेट स्वतःची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे, तर कल्याण ग्रामीणमधील उपशहर प्रमुख मनोज गणपत चौधरी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

नागपूरमध्ये ताफा अडवला

नागपूरमध्ये सोमवारी सकाळपासून इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर गर्दी केली. स्वपक्षातील कार्यकर्त्यांना डावलून काँग्रेसमधून आलेल्यांना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा देखील त्यांनी अडवला. बाहेरच्याच लोकांना पक्ष उमेदवारी देत असेल, तर अनेक वर्षांपासून पक्षात असणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे काय? असा सवाल त्यांनी केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >