मुंबई : पश्चिम रेल्वेने कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गाच्या बांधकामासाठी १८ जानेवारी २०२६ पर्यंत ३० दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या काही लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, ३० डिसेंबरच्या रात्रीपासून ते ६ जानेवारीपर्यंत वेगवेगळ्या मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अप जलद मार्गावर रात्री ११.१५ ते सकाळी ३.१५ वाजेपर्यंत ब्लॉक राहील. तसेच पाचव्या मार्गावर रात्री ११ ते सकाळी ३.३० वाजेपर्यंत ब्लॉक लागू असेल. डाउन जलद मार्गावरही वरील शटडाऊनच्या कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
या ब्लॉकदरम्यान काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात येऊ शकतात. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची सद्यस्थिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वेतर्फे करण्यात आले आहे. सहावा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवांवरील ताण कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.






