मुंबई : भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर आणि भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी अरबी समुद्रात 'आयएनएस वाघशीर' या पाणबुडीतून प्रवास करत एक नवा इतिहास रचला. कर्नाटकच्या कारवार नौदल तळावरून त्यांनी या मोहिमेला सुरुवात केली. सुमारे दोन तास चाललेल्या या सफरीदरम्यान राष्ट्रपतींनी समुद्राच्या खोलीत जाऊन नौदलाच्या सायलेंट आर्म म्हणजेच पाणबुडी विभागाच्या कार्यक्षमतेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या द्रौपदी मुर्मू या भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. यापूर्वी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी असा प्रवास केला होता. या ऐतिहासिक प्रसंगी नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी त्यांच्यासोबत उपस्थित होते. स्वदेशी बनावटीच्या कलवरी श्रेणीतील या पाणबुडीवर राष्ट्रपतींचे आगमन होणे, हे भारतीय नौदलाच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक मानले जात आहे.
या दोन तासांच्या मोहिमेत राष्ट्रपतींनी पाणबुडीतील विविध तांत्रिक बाबी समजून घेतल्या. त्यांनी पाणबुडीतील क्रू मेंबर्सशी संवाद साधून त्यांच्या खडतर जीवनाची माहिती घेतली. यावेळी नौदलाने विविध ऑपरेशनल प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये यशस्वी गोळीबार आणि आव्हानात्मक मोहिमांचा समावेश होता. राष्ट्रपतींनी व्हिजिटर्स बुकमध्ये आपला अनुभव नोंदवताना लिहिले की, आयएनएस वाघशीरवरील शिस्त, आत्मविश्वास आणि उत्साह पाहून मला खात्री पटली आहे की, आपले नौदल कोणत्याही संकटाचा सामना करण्यास पूर्णपणे सज्ज आहे.
आयएनएस वाघशीर ही प्रोजेक्ट ७५ अंतर्गत बांधलेली सहावी आणि शेवटची स्कॉर्पिन श्रेणीतील डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी आहे. ही पाणबुडी पृष्ठभागावरील युद्ध, पाणबुडीविरोधी युद्ध, गुप्तचर माहिती गोळा करणे आणि पाळत ठेवणे अशा बहुआयामी मोहिमा पार पाडण्यास सक्षम आहे. तिचे 'वीरता वर्चस्व विजया' हे ब्रीदवाक्य तिच्या शौर्याची साक्ष देते.






