Tuesday, December 30, 2025

पालिका निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा

पालिका निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांची महायुती माध्यमातून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. या पत्रकार परिषदेत महायुतीच्या नेत्यांनी एकत्रितपणे उपस्थित राहून निवडणूक रणनीती आणि आगामी वाटचालीबाबत भूमिका स्पष्ट केली. ७८ जागांपैकी ७१ भाजप, ४ शिवसेना, २ राष्ट्रवादी काँग्रेस तर १ जागा आरपीआय असा फॉर्म्युला यावेळी जाहीर झाला. शहरातील मार्केट यार्ड येथे झालेल्या या पत्रकार परिषदेत आमदार महेश बालदी व महायुतीच्या नेत्यांनी ही घोषणा केली. त्या अानुषंगाने पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार असल्याचा विश्वास महायुतीच्या नेते मंडळींनी व्यक्त केला.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँगेसचे नेते शिवदास कांबळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण भगत, रपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू आदी उपस्थित होते. यावेळी महायुतीची घोषणा करताना पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध असून, आतापर्यंत राबविण्यात आलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा एकदा जनतेचा भक्कम पाठिंबा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पनवेल महानगरपालिकेत स्थिर व सक्षम प्रशासन देण्यासाठी महायुती एकत्र आली असून, विकासाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे नेत्यांनी स्पष्ट केले. शहरातील प्रत्येक प्रभागाचा समतोल विकास, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि पारदर्शक कारभार हे महायुतीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही सांगण्यात आले. आज सर्व उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले.

Comments
Add Comment