रामदास आठवले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर महायुतीकडून सकारात्मक प्रतिसाद
मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे (आरपीआय) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यानंतर महायुतीने तातडीने दखल घेतली आहे. आरपीआयच्या नाराजीचे वृत्त समोर येताच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन आठवले यांची वांद्रे येथील कार्यालयात भेट घेतली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, आरपीआयने स्वबळावर उतरवलेल्या ३८ उमेदवारांपैकी मेरिट असलेल्या १५ जागांवर महायुतीकडून पाठिंबा देण्यात येणार आहे. तसेच, निवडक जागा आरपीआयला सोडण्याबाबत बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत आठवले यांची संयुक्त बैठक होणार आहे, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी बैठकीनंतर दिली.
वांद्रे येथील कार्यालयात प्रवीण दरेकर यांनी रामदास आठवले यांची भेट घेतली. अर्धा तास चालेल्या चर्चेत आरपीआयची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महत्वाच्या जागा आरपीआयला सोडण्याबाबत महायुतीत सकारात्मक विचारविनिमय सुरू असल्याचे दरेकर यांनी सांगितले.






