Tuesday, December 30, 2025

वर्षभराचा देखणा प्रवास!

वर्षभराचा देखणा प्रवास!

सौंदर्य तुझं : प्राची शिरकर

१ जानेवारी २०२५... नवीन वर्षाची नवी पहाट आणि 'प्रहार'च्या 'स्त्री ही मल्टिटास्कर' पुरवणीमध्ये एक नवीन सदर सुरू झालं - 'सौंदर्य तुझं...'. आज ३० डिसेंबर! कॅलेंडरचं पान उलटता उलटता कधी वर्ष संपलं आणि या सदराने कधी तुमच्या आयुष्यात आणि माझ्या लेखणीत घर केलं, हे समजलंच नाही. आज या वर्षभराच्या प्रवासाकडे वळून पाहताना मन कृतज्ञतेने भरून आलं आहे.

सौंदर्याची व्याख्या बदलताना... या वर्षभरात आपण फक्त चेहऱ्याला ग्लो कसा आणायचा, इतपतच मर्यादित राहिलो नाही. 'सौंदर्य तुझं...' या सदरातून आपण स्किन केअर, हेअर केअर, महिलांसाठी फॅशन यासोबतच एक सकारात्मक जीवनशैली कशी असावी, याचाही विचार केला. पावसाळ्यात केसांची निगा कशी राखायची, उन्हाळ्यात त्वचेचं रक्षण कसं करायचं, सणासुदीला कोणते आऊटफिट निवडाल, इथपासून ते मानसिक शांतता सौंदर्यासाठी कशी गरजेची आहे, इथपर्यंतचे सर्व विषय आपण स्पर्शिले. हा प्रवास केवळ माझा नव्हता, तर वाचकांचाही होता. प्रत्येक आठवड्याला जेव्हा वाचकांचे अभिप्राय मिळायचे, तेव्हा खऱ्या अर्थाने समाधान मिळायचं. कुणाला आऊटफिट्स आवडले, कुणाला किचनमधील साहित्यापासून बनवलेला फेसपॅक आवडला, तर कुणाला केमिकलमधून केसांची सुटका कशी करायची या टिप्स उपयोगाला आल्या. तुमची प्रत्येक दाद ही माझ्यासाठी पुढील लेख अधिक अभ्यासपूर्ण लिहिण्याची प्रेरणा होती.

लेखिका म्हणून मला या वर्षाने खूप काही दिलं. महिलांसाठी कोणकोणत्या विषयांवर लिहिता येईल, जेणेकरून मी वाचकांपर्यंत पोहोचवू शकेन या सर्वच गोष्टींचा आणि नवनवीन विषयांचा अभ्यास करता आला. वाचकांना काय हवंय, हे समजून घेताना एक 'मल्टिटास्कर' मैत्रीण म्हणून मी तुमच्याशी जोडले गेले. अनेकांनी कळवलं की, "तुमच्या लेखामुळे आम्ही स्वतःसाठी वेळ द्यायला शिकलो," हे ऐकल्यावर वाटलं की माझ्या लेखणीचं सार्थक झालं. आता संवाद सुरूच राहील! हे वर्ष संपत असलं, तरी आपली ही मैत्री आणि सौंदर्याचा हा प्रवास थांबणार नाही. वर्षभरात तुम्हाला माझे लेख कसे वाटले? कोणत्या टिप्स तुम्हाला सर्वात जास्त आवडल्या? किंवा येणाऱ्या काळात तुम्हाला कोणत्या विषयांवर वाचायला आवडेल? हे मला नक्की कळवा. तुमचे अनुभव, शंका आणि अभिप्राय जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल.

तुमच्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा आहे! तुम्ही तुमचे विचार मला खालील दिलेल्या मेल आयडीवर पाठवू शकता...

prachishirkar99@gmail.com

येणारं नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सौंदर्याचं, आरोग्याचं आणि आनंदाचं जावो, हीच सदिच्छा!

Comments
Add Comment