गेटवे ते गोराईपर्यंत बेस्टची स्पेशल राइड
मुंबई : नववर्ष स्वागतासाठी बुधवारी (दि. ३१) रोजी रात्री मोठ्या प्रमाणावर नागरिक समुद्रकिनाऱ्यांकडे नववर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी जाणार असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई खाडी, मार्वे चौपाटी आदी ठिकाणी जाण्यासाठी रात्री १० वाजल्यापासून १२.३० वाजेपर्यंत विविध बसमार्गांवर अतिरिक्त बसफेऱ्या सुरू करण्यात येणार असून, प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे. याअंतर्गत बसमार्ग क्र. ए-२१, सी-८६, ए-११२, ए-११६, २०३, २३१, ए-२४७, ए-२७२ आणि ए-२९४ या मार्गांवर अतिरिक्त बसगाड्या धावणार आहेत. तसेच ‘हेरिटेज टूर’ हा विशेष बसमार्ग बुधवारी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून गुरुवारी नववर्षाच्या पहाटेपर्यंत प्रवासी प्रतिसादानुसार चालविण्यात येणार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्ष स्वागतासाठी प्रवाशांनी बेस्ट उपक्रमातर्फे सुरू करण्यात येणाऱ्या या अतिरिक्त बसफेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अतिरिक्त बसफेऱ्यांचा तपशील पुढीलप्रमाणे :- बस मार्ग ए-२१ (डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते देवनार आगार) – ३ बस
- सी-८६ (डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते वांद्रे आगार) – ३ बस,
- ए-११२ (डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते चर्चगेट स्थानक) – ३ बस
- ए-११६ (डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) – ५ दुमजली बस
- २०३ (अंधेरी स्थानक (पश्चिम) ते जुहू चौपाटी) – २ बस
- २३१ (सांताक्रूझ स्थानक (पश्चिम) ते जुहू बस स्थानक) – ४ बस
- ए-२४७ व ए-२९४ (बोरिवली बस स्थानक (पश्चिम) ते गोराई बीच) – २ बस
- ए-२७२ (मालाड स्थानक (पश्चिम) ते मार्वे चौपाटी) – २ बस.






