एकसारखाच पॅटर्न - आधी सोशल मीडियावर आरोप, नंतर जमावाचा हिंदू वस्त्यांवर हल्ला
ढाका : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांविरुद्ध ईशनिंदा म्हणजे धर्माचा अपमान करण्याच्या आरोपांशी संबंधित प्रकरणांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. जून ते डिसेंबर २०२५ दरम्यान असे ७१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही माहिती बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर काम करणाऱ्या 'ह्यूमन राइट्स काँग्रेस फॉर बांगलादेश मायनॉरिटीज' या संस्थेच्या अहवालात समोर आली आहे.
मानवाधिकार कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, हल्ल्यासाठी प्रत्येक वेळी एकच पद्धत वापरली जात आहे. आधी सोशल मीडियावर आरोप, मग तत्काळ अटक, त्यानंतर जमाव जमणे आणि हिंदू वस्त्यांवर हल्ला. आता ईशनिंदेचे आरोप भीती पसरवण्याचे आणि अल्पसंख्याकांना दाबण्याचे हत्यार बनत आहेत.
एचआरसीबीएमचे म्हणणे आहे की, या घटना देशातील ३० हून अधिक जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या आहेत. एकाच प्रकारच्या इतक्या मोठ्या संख्येने घटना घडणे, यातून या केवळ तूरळक घटना नाहीत, तर अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याचा एक ट्रेंड बनत चालला आहे असे दर्शवते. अहवालानुसार, जसे एखाद्यावर ईशनिंदेचा आरोप लागतो, पोलीस तत्काळ कारवाई करते, परंतु त्याचबरोबर परिसरात जमाव जमतो आणि हिंसाचार सुरू होतो. अनेकदा आरोप एका व्यक्तीवर असतो; परंतु संतप्त जमाव संपूर्ण हिंदू वस्तीला शिक्षा देतो.
१९ जून २०२५ रोजी बरिसाल जिल्ह्यात २२ वर्षीय तमाल वैद्य याला पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल कथित टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी चांदपूरमध्ये
२४ वर्षीय शांतो सूत्रधार याच्यावर आरोप झाल्यानंतर परिसरात तणाव पसरला आणि निदर्शने झाली.२७ जुलै रोजी रंगपूर जिल्ह्यात सर्वात गंभीर घटना घडली. येथे १७ वर्षीय रंजन रॉयला अटक केल्यानंतर जमावाने हिंदूंच्या सुमारे २२ घरांची तोडफोड केली. या घटनेने हे स्पष्ट केले की, आरोप होताच परिस्थिती किती लवकर नियंत्रणाबाहेर जाते. १८ डिसेंबर २०२५रोजी मयमनसिंह जिल्ह्यातील भालुका परिसरात३० वर्षीय दीपू चंद्र दास याला जमावाने मारहाण करून ठार केले आणि नंतर त्याच्या मृतदेहाला आग लावली. यापूर्वी सप्टेंबर २०२४ मध्ये खुलना येथे १५ वर्षीय उत्सव मंडलवर हल्ला झाला होता, ज्यात त्याचा मृत्यू झाला होता. या घटनांनी संपूर्ण देशात चिंता वाढवली आहे.
संस्थेचे म्हणणे आहे की, अनेक प्रकरणांची सुरुवात सोशल मीडियावरून होते. अनेकदा असे आरोप पोस्टवर केले जातात, जे बनावट असतात किंवा खाते हॅक करून टाकलेले असतात. कोणत्याही ठोस चौकशीशिवाय केवळ तोंडी आरोपांवरच गुन्हा दाखल होतो. तरीही, पोलिस जमावाच्या दबावाखाली येऊन तात्काळ कारवाई करतात. अहवालात नमूद केले आहे की या प्रकरणांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त आरोपी हिंदू आहेत. अनेक पीडित अल्पवयीन आहेत, ज्यांचे वय १५ ते १७ वर्षांच्या दरम्यान आहे.






