Tuesday, December 30, 2025

तिकीट वाटपावरून मातोश्रीत मध्यरात्री जोरदार राडा

तिकीट वाटपावरून मातोश्रीत मध्यरात्री जोरदार राडा

मुंबई : मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये रविवारी मध्यरात्री जोरदार राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. आमदार वरुण सरदेसाई यांच्या सांगण्यावरून अनिल परब समर्थकाचे तिकीट कापल्याने वादाला सुरुवात झाली. पुढे हा वाद टोकाला गेला आणि परब-सरदेसाई हमरातुमरीवर आले. शेवटी पक्षप्रमुखांनी भाच्याची बाजू घेतल्याने स्वतःला निष्ठावंत म्हणून घेणारे परब रागाने लालबूंद झाले आणि बैठक सोडून तडकाफडकी घरचा रस्ता धरला.

अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील प्रभाग क्रमांक ९५ च्या उमेदवारीवरून हा वाद झाला. अनिल परब यांनी या जागेसाठी त्यांचे समर्थक चंद्रशेखर वायंगणकर यांचे नाव निश्चित केले होते. मात्र, ऐनवेळी वायंगणकर यांचे तिकीट कापून श्रीकांत सरमळकर यांचे जावई आदिक शास्त्री यांना उमेदवारी देण्यात आली. शास्त्री यांच्या नावासाठी स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांनी शिफारस केली होती.

मात्र, आपल्या समर्थकाचे तिकीट कापले गेल्याने अनिल परब यांचा संयम सुटला. मध्यरात्री सुरू असलेल्या बैठकीत त्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला. त्यात सरदेसाई यांनी मध्ये तोंड घातल्याने, दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. शेवटी वाद इतका विकोपाला गेला, की परब संतापून बैठक सोडून गेले. आता हा वाद कोणते स्वरुप धारण करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >