Monday, December 29, 2025

मुंबई उपनगरीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलणार

मुंबई उपनगरीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलणार

१८,३६४ कोटींचे ४०० किमी रेल्वे प्रकल्प मार्गी

मुंबई : मुंबईची उपनगरीय रेल्वेव्यवस्था येत्या काही वर्षांत आमूलाग्र बदलणार आहे. वाढती प्रवासीसंख्या, लोकलमधील प्रचंड गर्दी आणि वारंवार होणारा विलंब या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मध्य व पश्चिम रेल्वेकडून तब्बल १८ हजार ३६४.९४ कोटी रुपये खर्चाचे ४००.५३ किलोमीटर लांबीचे विविध रेल्वे प्रकल्प राबवले जात आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लोकल तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांची संख्या वाढण्यासोबतच वेळपालनात लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

मुंबईची उपनगरी रेल्वेसेवा सध्या सीएसएमटी ते कर्जत-खोपोली, कसारा, पनवेल, वांद्रे, ठाणे-पनवेल तसेच नेरूळ-बेलापूर ते उरण या मार्गांवर विस्तारलेली आहे. या सर्व मार्गांवर प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत असून त्यानुसार पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नेरूळ-उरण मार्गावर १० नव्या लोकल सेवा सुरू करण्यात आल्या असून तरघर आणि गव्हाण ही दोन नवी स्थानकेही कार्यान्वित झाली आहेत.

मध्य रेल्वेवर क्षमतेत मोठी वाढ

मध्य रेल्वेवर सुरू असलेल्या सीएसएमटी-कुर्ला पाचवा व सहावा मार्ग, पनवेल-कर्जत उपनगरी कॉरिडॉर, कल्याण-आसनगाव चौथा मार्ग, कल्याण-बदलापूर तसेच बदलापूर-कर्जत अतिरिक्त मार्ग आणि ऐरोली-कळवा उन्नत लिंक या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे मार्गक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या कामांमुळे नव्या लोकल फेऱ्या सुरू करणे शक्य होणार असून, गाड्यांमधील गर्दी कमी होऊन वेळपालन सुधारेल. विशेषतः बदलापूर-कर्जत मार्ग हा मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या मार्गामुळे मुंबई-पुणे प्रवास अधिक सुलभ होण्यासोबतच मालवाहतुकीला गती मिळणार असून पर्यावरणीय लाभही अपेक्षित आहेत.

पश्चिम रेल्वेवरही प्रवाशांना दिलासा

पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल-बोरिवली सहावा मार्ग, गोरेगाव-बोरिवली हार्बर मार्गिका, बोरिवली-विरार पाचवा व सहावा मार्ग आणि विरार-डहाणू अतिरिक्त मार्ग या प्रकल्पांमुळे प्रवासी व मुख्य गाड्यांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यामुळे विरारपलीकडील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, मुख्य व उपनगरी गाड्यांचे स्पष्ट विभाजन करणे शक्य होईल. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, हे सर्व प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण झाल्यानंतर मुंबई उपनगरी रेल्वेचा चेहरामोहरा बदलणार असून प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक विश्वासार्ह, आरामदायी आणि वेळेवर होणार आहे.

Comments
Add Comment