पहिल्या टप्प्यात १२ जिल्हे, १२५ पंचायत समित्या
राज्य निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण
मुंबई : राज्यात नगर परिषद, नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तर, दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचाही धुरळा लवकरच उडणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होणार असून, ८ जानेवारीपूर्वी आचारसंहिता लागण्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषदेची निवडणूक दोन टप्प्यांत पार पडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पहिल्या टप्प्यात १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका अवघ्या २१ दिवसांत पार पाडल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
३१ जानेवारीची डेडलाईन ओलांडणार?
उर्वरित जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका मात्र ३१ जानेवारीनंतरच घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दिलेली ३१ जानेवारीची मुदत ओलांडली जाण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात आरक्षण मर्यादा ओलांडल्या प्रकरणी २१ जानेवारी रोजी निर्देश येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीनंतरच राज्य निवडणूक आयोग या निवडणुका जाहीर करण्याची शक्यता आहे.
पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्हा परिषदा
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये आरक्षण निश्चित करताना २० जिल्हा परिषदांमध्ये आणि २११ पंचायत समित्यांमध्ये ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे सध्या केवळ आरक्षण मर्यादेचे पालन करणाऱ्या १२ जिल्हा परिषदांच्याच निवडणुका घेण्यात येणार आहेत. या यादीत सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या घोषणेकडे राजकीय पक्षांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी तयारी पूर्ण केली असून, ८ ते १० जानेवारीदरम्यान अधिकृत घोषणा होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.






