Sunday, December 28, 2025

हिरवी मिरची घेणार की, ढोबळी मिरची?

हिरवी मिरची घेणार की, ढोबळी मिरची?

निवडणूक चिन्हांमध्ये २३ खाद्यपदार्थांचा समावेश

गणेश पाटील विरार : महापालिकेच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारांकरिता १९४ निवडणूक चिन्हं राज्य निवडणूक आयोगाने मुक्त ठेवली आहेत. या चिन्हांमध्ये हिरवी मिरची, ढोबळी मिरची, आले, भुईमूग, फुलकोबी, वाटाणे, भेंडी अशा एकूण २३ प्रकारच्या भाजीपाला, फळे आणि खाद्यपदार्थांचा समावेश आहे. त्यामुळे किती अपक्ष उमेदवार खाद्यपदार्थांमधील चिन्हांना पसंती देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय पक्षांकरिता पाच चिन्ह राखीव ठेवण्यात आली आहेत. यामध्ये कमळ, हत्ती पंजा, झाडू आणि हातोडा, विळा, तारा या एकत्रित चिन्हांचा समावेश आहे. तर राज्यस्तरीय पक्षासाठी घड्याळ, धनुष्यमान, रेल्वे इंजिन, मशाल आणि तुतारी वाजवणारा माणूस ही चिन्हे राखीव ठेवण्यात आली आहेत. इतर राज्यातील पक्षांसाठी सुद्धा नऊ चिन्ह राखीव ठेवण्यात आली आहेत. तसेच अपक्ष उमेदवारांकरिता एकूण १९४ चिन्ह राखीव ठेवण्यात आली आहेत. फुलकोबी, ऊस, सफरचंद, अननस, बिस्कीट, केक, आले, पेरू, वाटाणे, आईस्क्रीम, मका, द्राक्षे, हिरवी मिरची, फणस, कलिंगड, ढोबळी मिरची, पाव, सूर्यफूल, अक्रोड, भेंडी, नारळ आणि जेवणाच्या थाळीचा सुद्धा या चिन्हांमध्ये समावेश आहे. खाद्यपदार्थांव्यतिरिक्त इंजेक्शन, टूथपेस्ट, साबण, सेफ्टी पीन, उशी, डंबल, चहा गाळणी, हिरा, कंगवा, सॉक्स, पोळपाट लाटणे, स्टेपलर, ब्रेड टोस्टर आणि दात घासायचा ब्रश अशा प्रकारच्या चिन्हांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे.

दरम्यान, अपक्ष उमेदवार हे बस, ट्रक, ट्रॅक्टर, ऑटो रिक्षा, टेबल, सिलिंडर, कपाट, बस, शिलाई मशीन, दूरदर्शन टीव्ही, चष्मा अशा प्रकारच्या चिन्हांनाच नेहमी पसंती देतात. अपक्ष उमेदवारांना नामनिर्देशनपत्रामध्ये तीन चिन्हांचा प्राधान्यक्रम देण्याची संधी मिळते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या क्रमवारीनुसार उमेदवारांना चिन्हाचे वितरण केले जाते.

दरम्यान, भाजीपाला, फळे किंवा खाद्यपदार्थ म्हणून निवडणूक चिन्हांची निवड अपक्षच काय कोणत्याही स्थानिक आघाड्यांकडून केली जात नाही. मात्र उमेदवारांना जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध व्हावेत म्हणून अशा वस्तूंचा निवडणूक चिन्ह म्हणून आयोगाकडून वापर केला जातो.

Comments
Add Comment