वागळे इस्टेट परिसरातील नागरिक घाबरले
ठाणे : दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील पोखरण रोडमध्ये बिबट्या दिसला होता. आज वागळे इस्टेटमधील वारली पाडा परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. हा बिबटा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
गुरुवारी पोखरण रोड क्रमांक दोन येथील एका गृहसंकुलाजवळ बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर, शुक्रवारी रात्री वागळे इस्टेटमधील वारली पाडा परिसरातही बिबट्याचा वावर पाहायला मिळाला. दोन दिवसांपूर्वी मीरा-भाईंदर भागातही बिबट्याचे दर्शन आल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते.
वागळे इस्टेट परिसरातील एका घरासमोरील बिबट्याचा प्रवास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून आला.
घटनास्थळी तातडीने वन विभागाचे पथक दाखल झाले आणि शुक्रवारी रात्री तसेच शनिवारी सकाळी शोध मोहीम राबवली, मात्र बिबट्याचा पुन्हा शोध लागला नाही. सुरक्षेच्या दृष्टीने वन विभागाने परिसरात गस्त वाढवली असून ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत. बिबट्या आढळलेला हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर जंगलापासून काही अंतरावर असल्यामुळे वन विभागाचा अंदाज आहे की हा बिबटा तिथूनच परिसरात आला असावा.






