भाजप स्वबळावर जाण्यास तयार
ठाणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर ठाण्यात भाजप आणि शिवसेना युती होणार की नाही, असा प्रश्न चर्चेत आहे. भाजपकडून शिवसेनेला उद्याची डेडलाईन देण्यात आली आहे. उद्यापर्यंत चर्चा झाली नाही तर परवा पासून भाजप स्वबळावर लढण्यास मोकळे असल्याचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी स्पष्ट केले. ठाण्यात युती विना किंवा युतीसह भाजप दोन्हीसाठी तयार असल्याचे मत आ.केळकर यांनी व्यक्त केले. आतापर्यंत झालेल्या चर्चेत काहीही निष्पन्न झाले नाही. शिवसेना उद्या तरी चर्चेला जाणार का? यावर ठाण्यातील युतीचे भविष्य अवलंबून आहे. युतीच्या दोन बैठका झाल्या आहेत. त्याच्यातून फारसे काहीही निष्पन्न झालेले नाही. उद्याची डेडलाईन आम्ही दिलेली आहे असे केळकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपने ठाण्यात घरोघरी प्रचार सुरू केला आहे. ''युतीसाठीचा फॉर्म्युला आम्ही पक्षश्रेष्ठींना दिलेला आहे. आजच आमची बैठक झाली आहे. प्रदेश अध्यक्षांकडे ज्या काही फॉर्म्युल्याच्या गोष्टी आहेत. जे काही भाजपाला युतीसंदर्भातील तपशील आहे तो त्यांना दिलेला आहे. आम्ही त्यांना सांगितले आहे की, उद्यापर्यंत निर्णय घ्यावा. ठाण्यात लोकांना युतीसह किंवा स्वतंत्रपणे लढण्याची सवय आहे. २०१७ ला स्वतंत्रपणे लढले होते. त्याआधी दोन वेळेला स्वतंत्रपणे लढले, तीन वेळा युतीसह लढले. त्याच्यामुळे मला असे वाटत नाही की ही स्फोटक अशी गोष्ट नाही. दोन्हींसाठी लोकांना सवय आहे. त्यामुळे आम्ही या दोन्ही पर्यायांसाठी सज्ज आहोत.''असे आ. केळकर म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात भेट झाली होती. मात्र, आ.केळकरांनी सूचक वक्तव्य केल्याने ठाण्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होणार का नाही? हे चित्र स्पष्ट होणे गरजेचे आहे. ठाण्यात भाजप-शिवसेना युती होईल की स्वतंत्र लढणार, हे उद्याच्या चर्चेनंतरच स्पष्ट होणार आहे.






