Saturday, December 27, 2025

महायुतीचा फॉर्म्युला ठरला

महायुतीचा फॉर्म्युला ठरला

मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजप १४०, शिवसेना ८७ जागा लढणार?

राष्ट्रवादीच्या महायुतीमधील समावेशाची शक्यता धूसर

मुंबई : बहुचर्चित मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर भाजप १४० आणि शिवसेनेने ८७ जागा लढवण्याचा निर्णय झाल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

या निर्णयामुळे महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश मुंबईत होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. राष्ट्रवादीला मुस्लीमबहुल प्रभागातील १०-१५ जागा हव्या होत्या, मात्र भाजपच्या आक्षेपामुळे आणि जागावाटपाच्या मर्यादेमुळे राष्ट्रवादीला मुंबईतून बाहेर ठेवण्यात आले आहे. अंतिम सूत्रानुसार मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी भाजप १४० जागा लढवणार असून, शिवसेनेला ८७ जागा मिळणार आहेत. रिपाइं आणि रिपब्लिकन सेनेसह छोट्या मित्रपक्षांनाही काही जागा सोडल्या जाणार आहेत.

दरम्यान, ३० डिसेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून सोमवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे; तर शिवसेनेकडून थेट संबंधित उमेदवाराला बोलावून 'एबी' फॉर्म दिला जाईल, असे कळते.

छोट्या मित्रपक्षांना मिळणार वाटा

महायुतीतील छोटे मित्रपक्षही या जागावाटपात समाविष्ट आहेत. रामदास आठवले यांच्या रिपाइंला (आरपीआय) भाजपच्या कोट्यातून जागा सोडल्या जाणार आहेत; तर आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला शिवसेनेच्या कोट्यातून काही जागा दिल्या जाणार आहेत.

महायुतीत कोणताही संभ्रम नाही! : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई पालिकेत भाजप-शिवसेना एकत्र लढत असल्याची घोषणा कधी होणार, असे विचारले असता फडणवीस म्हणाले, महायुतीची घोषणा करण्याची आम्हाला कोणतीही घाई नाही. आम्ही आधीपासूनच एकत्र आहोत आणि आमच्यात कोणताही संभ्रम नाही. विरोधकांकडून सोडल्या जाणाऱ्या पुड्या या केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी आहेत. आमच्यातील एकजूट कृतीतून दिसते, घोषणांमधून नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. पुतीन आणि झेलेन्स्की एकत्र येणार असतील, तरच त्यांना घोषणा करावी लागते, असा उपरोधिक टोलादेखील त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीला लगावला. त्यांनी घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात त्यांच्यात नेमके काय सुरू आहे, हेच कुणालाच कळत नाही. पण, महायुती योग्य वेळी योग्य पद्धतीने आपली भूमिका जाहीर करेल, असे फडणवीस म्हणाले.

राष्ट्रवादी महायुतीत नाही?

राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत महायुतीत स्थान मिळण्याची अपेक्षा होती. पक्षाने मुस्लीमबहुल २५ प्रभागांपैकी १०-१५ जागांची मागणी केली होती. मात्र, नवाब मलिकांवर भाजप नेत्यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे राष्ट्रवादीला मुंबईतून दूर ठेवण्यात आले.

नेमके काय घडले? : भाजप-शिवसेनेत गेल्या काही आठवड्यांपासून जागावाटपाच्या चर्चा सुरू होत्या. पहिल्या फेरीत भाजपने शिवसेनेला केवळ ५२ जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यांनी हा प्रस्ताव नाकारत १२५ जागांची मागणी लावून धरली होती. त्यानंतर भाजपने त्यांना ७२ जागांचा नवा प्रस्ताव दिला. त्यालाही शिवसेनेने नकार दिला. अलीकडील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील निकालांमुळे शिवसेनेची बॅर्गेनिंग पॉवर वाढली. या निवडणुकीत भाजप पहिला मोठा पक्ष ठरला असला तरी शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली. परिणामी, मुंबईतील जागावाटपात त्यांना सन्मानजनक वाटा मिळाला.

विदर्भात भाजप-शिवसेना एकत्र

  •  विदर्भात महायुती स्वतंत्र लढणार की एकत्र याबाबतीत निर्णय झाला आहे. महायुतीची नागपुरात शुक्रवारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने महत्त्वाची बैठक झाली. शिवसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत, संजय राठोड आणि राज्यमंत्री आशीष जयसवाल यांच्यासह अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या चार महानगरपालिका क्षेत्रांतील समन्वयाची जबाबदारी असलेले शिवसेनेचे सर्व नेते उपस्थित होते.

  • या बैठकीत चारही महानगरपालिकांमध्ये भाजप-शिवसेना महायुती करण्याचा निर्णय जवळपास अंतिम झाला आहे. २४ तासांत जागावाटप पूर्ण होईल, अशी माहिती बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत येण्याचे संकेत आहेत. अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांचा पक्ष महायुतीसोबत येत आहे, असे ते म्हणाले.

  • चंद्रपूरमध्येही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबत येण्याची शक्यता आहे. ही निवडणूक माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून सर्वांनी त्यांचे नेतृत्व मान्य केल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

  • नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे. २७ डिसेंबरपर्यंत त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होतील. अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजप ४५ ते ५० जागेवर लढणार आहे, तर १८ ते २० जागा शिवसेना आणि युवा स्वाभिमान पार्टीला ९ ते १२ जागा देण्याचे ठरवण्यात आल्याचे कळते.
Comments
Add Comment