नवी मुंबई शहराच्या पाणीपुरवठ्याला चालना मिळणार
नवी मुंबई : नवी मुंबईला सातत्यपूर्ण आणि सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी राबवण्यात येणारा हेटवणे पाणीपुरवठा वाढीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २९ डिसेंबर रोजी महत्त्वाचा टप्पा गाठणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्र राज्य रस्ते व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) पहिल्यांदाच टनेल ब्रेकथ्रू साध्य करणार असून, वॉटर टनेल पॅकेज-१ अंतर्गत वहाळ गावातील शाफ्ट-४ येथे हा ऐतिहासिक टप्पा पूर्ण होणार आहे.
नवी मुंबई तसेच सिडको विकसित परिसरातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकडून राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पात १३.२५ किमी लांबीचा कच्च्या पाण्याचा टनेल आणि १५.४ किमी लांबीचा प्रक्रिया केलेल्या पाण्याचा टनेल उभारण्यात येत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिडकोची सध्याची १२० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पाणीपुरवठा क्षमता वाढून तब्बल २७० एमएलडी होणार आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सिडकोकडून प्रथमच टनेल प्रकल्प राबवण्यात येत आहे. या पहिल्या टनेल ब्रेकथ्रूमुळे उर्वरित कामाला गती मिळणार असून, भविष्यात नवी मुंबईसाठी दीर्घकालीन पाणी सुरक्षेच्यादृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पॅकेज-१ अंतर्गत ८.७ किमी लांबीचा प्रक्रिया केलेल्या पाण्याचा टनेल उभारण्यात येत असून, त्यापैकी आतापर्यंत ५.५२ किमी खोदकाम पूर्ण झाले आहे. हा टनेल जमिनीखाली सुमारे १०० मीटर खोलीवरून जात आहे. डेक्कन सह्याद्री भागातील कठीण खडक, कामाच्या ठिकाणी मर्यादित जागा आणि साहित्य बाहेर काढण्यातील आव्हाने यामुळे प्रकल्पात अडचणी आल्या. सिडकोचे अभियंते आणि ठेकेदार कंपनीच्या पथकातील सातत समन्वयामुळे काम यशस्वीपणे पुढे सरकले. टनेल ब्रेकथ्रू नवी मुंबईच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला नवे बळ देणारा ठरणार. शहराच्या विकासाला आवश्यक असलेली पाण्याची गरज भागवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.






