चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४२ धावांची आघाडी
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस मालिकेतील चौथी कसोटी मेलबर्नमध्ये खेळली जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात १५२ धावांवर सर्वबाद झाला, तर इंग्लंडचा संघ ११० धावाच करू शकला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ४२ धावांची आघाडी मिळाली.
बॉक्सिंग डे कसोटीत इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकत कांगारुंना प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. यानंतर पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. ट्रॅव्हिस हेड आणि जेक वेदरल्ड १२ आणि १० धावांवर बाद झाले, तर मार्नस लाबुशेननं फक्त सहा आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने फक्त नऊ धावा केल्या. उस्मान ख्वाजा चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवू शकला नाही आणि २९ धावांवर बाद झाला. अॅलेक्स कॅरीला फक्त २० धावा करता आल्या, तर कॅमेरॉन ग्रीनला फक्त १७ धावा करता आल्या. मायकेल नेसरने खालच्या फळीत शानदार फलंदाजी केली आणि त्याने नाबाद ३५ धावा केल्या. जोश टँगविरुद्ध कांगारु फलंदाज पूर्णपणे असहाय्य होते आणि संपूर्ण संघ फक्त १५२ धावांवरच गारद झाला. टँगने ४५ धावांत ५ बळी घेत कहर केला.
पहिल्या दिवशी २० विकेट
पहिल्या दिवशी एकूण २० फलंदाज बाद झाले, त्यातील सर्व फलंदाज जलद गोलंदाजांनी बाद केले. सुमारे १२४ वर्षांनंतर अॅशेस कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा हा पहिला दिवस होता. यापूर्वी, जानेवारी १९०२ मध्ये याच मैदानावर २५ विकेट्स पडल्या होत्या. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी गमावलेल्या विकेट्सची ही सर्वाधिक संख्या होती. मेलबर्न क्रिकेट मैदानावर कसोटी सामन्याच्या एकाच दिवशी २० किंवा त्याहून अधिक विकेट्स पडण्याची ही चौथी वेळ होती.
इंग्लंडची फलंदाजी सपशेल अपयशी
कांगारूंच्या १५२ धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजी करायला आलेल्या इंग्लंडची स्थिती ऑस्ट्रेलियापेक्षाही वाईट होती. कांगारू गोलंदाजांसमोर इंग्लिश फलंदाजांनी एकप्रकारे शरणागती पत्करली आणि संपूर्ण संघ फक्त ११० धावांतच तंबूत परतला. संघाकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक ४१ धावा केल्या, तर गस अॅटकिन्सनने २८ धावांचे योगदान दिले. पहिल्या डावात इंग्लंडचे आठ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. मायकेल नेसरने शानदार गोलंदाजी करत ४ बळी घेतले, तर बोलँडने ३ बळी घेतले. दिवसाच्या खेळाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने त्यांच्या दुसऱ्या डावात एकही बळी न गमावता ४ धावा केल्या होत्या. पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाकडे आता ४६ धावांची आघाडी आहे. मालिकेतील पहिले तिन्ही सामने जिंकून कांगारूमनी आधीच मालिका आपल्या नावावर केली आहे.
कमिन्स आणि लायन बाहेर
इंग्लंडकडून जोश टंगने ५ बळी घेतले. जोश टंगच्या चेंडूवर स्टीव स्मिथ बोल्ड झाला. टंगचा चेंडू थेट मधल्या स्टंपला लागला, स्वतः स्मिथही बाद झाल्याने आश्चर्यचकित झाला होता. स्टीव स्मिथ ३१ चेंडूंत ९ धावा काढून बाद झाला. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ॲशेस मालिका जिंकली आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने सुरुवातीच्या तीन सामन्यांमध्ये दमदार विजय मिळवला आहे. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाची मालिकेत ३-० अशी अभेद्य आघाडी आहे. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स तिसरा कसोटी सामना खेळल्यानंतर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ पुन्हा एकदा संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. तर अनुभवी फिरकीपटू नॅथन लायन देखील दुखापतीमुळे बाहेर पडला आहे आणि त्याची शस्त्रक्रिया झाली आहे.






