मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजुरीनंतर ‘एबी’ फॉर्मचे वाटप होणार
मुंबई : राजकारणात प्रयोगशील पक्ष अशी ओळख असलेली भाजप यंदा मुंबईत नवा प्रयोग करण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिनाभरापूर्वी केलेल्या घोषणेनुसार, भाजप यंदा जवळपास ३० टक्के नवे चेहरे मैदानात उतरवणार असून, ३५ वर्षांखालील तरुण उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उमेदवारांची यादी जवळपास तयार झाली असून, मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजुरीनंतर ‘एबी’ फॉर्मचे वाटप सुरू होणार आहे.
मुंबई भाजपच्या निवडणूक समितीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात पार पडली. या बैठकीत मुंबईतून जिल्हानिहाय आलेल्या उमेदवारांच्या नावांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर उमेदवार निश्चिती करून, यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाला पाठवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री फडणवीस मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि निवडणूक प्रभारी आशीष शेलार यांच्याशी चर्चा करून ही यादी अंतिम करतील.
‘मुंबई महापालिका निवडणुकीत ३५ वर्षांखालील ४० टक्के उमेदवारांना संधी देणार आहोत,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबर महिन्यात ‘युथ कनेक्ट’ कार्यक्रमात केली होती. त्यानुसार कार्यवाही करत, भाजपने यंदा तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे, ३५ वर्षांखालील अधिकाधिक उमेदवारांना यादीत स्थान देत, पन्नाशी ओलांडलेल्या माजी नगरसेवकांचे पत्ते कापण्यात आले आहेत. या ज्येष्ठ नेत्यांना २०२९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याची सूचना पक्षाकडून केली जाणार आहे. पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंघांची पुनर्रचना होणार असल्याने मुंबईत विधानसभा क्षेत्रांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे या ज्येष्ठ नेत्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवता येईल, असे भाजपचे नियोजन आहे.
काही जागांबाबत तिढा कायम
भाजप आणि शिवसेनेत अद्याप काही जागांबाबत एकमत झालेले नाही. शुक्रवारपर्यंत याबाबत तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे तिढा असलेल्या जागा वगळता भाजपने आपल्या उमेदवारांची यादी तयार केली आहे. वादग्रस्त जागांचा प्रश्न सुटल्यानंतर तेथील उमेदवारांबाबत निर्णय घेतला जाईल. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत जवळ आल्याने वेळेचे गणित महत्त्वाचे ठरत आहे. मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाल्यानंतर मुंबई भाजपकडून ‘ए+’ प्रभागांतील उमेदवारांना तत्काळ ‘एबी’ फॉर्मचे वाटप केले जाणार आहे. भाजप-शिवसेना-रिपाइं युतीची अधिकृत घोषणा करतानाच जागावाटपाचा फॉर्म्युला माध्यमांना सांगितला जाईल. मात्र, कोणता प्रभाग कोणता पक्ष लढवेल, याची सविस्तर माहिती जाहीर केली जाणार नाही. संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी ही खबरदारी घेतली जाणार आहे.






