Friday, December 26, 2025

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांची गळचेपी

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांची गळचेपी

मागील ११ वर्षांत मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ११० हून अधिक मराठी शाळांना टाळे

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचा शिक्षण विभाग गुणवत्तावाढीसाठी विविध प्रयत्न करीत असला तरीही अनेक शाळांचे प्रश्न प्रलंबित आहेत. मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांचे घटते प्रमाण, पुनर्बांधणीसाठी तोडलेल्या शाळांचे रखडलेले बांधकाम, समायोजित विद्यार्थ्यांची दूरच्या शाळेत पायपीट, इंग्रजी माध्यमांना तुलनेने अधिक प्राधान्य, अपुरा शिक्षक वृंद आदी विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांची गळचेपी होऊ लागली आहे. याबाबत शैक्षणिक कार्यकर्ते, विविध संघटनांनी वारंवार पाठपुरावा केला. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळांचा दर्जा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण विभागातर्फे विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र, तरीही पालिकेच्या अनेक शाळांमध्ये मूलभूत सोयी – सुविधा पुरविण्यात पालिकेला यश आलेले नाही. शिक्षण विभागासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणाऱ्या महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुलभ सुविधा मिळणे अपेक्षित असले तरीही बहुतांश शाळांमधील वास्तव निराशाजनक आहे.

वर्ष २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात मुंबई महापालिका मराठी माध्यमाच्या ३६८ शाळा चालवत होती. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शाळांची संख्या २५४ इतकी झाली आहे. म्हणजे ११ वर्षांत ११० हून अधिक शाळा बंद झाल्या आहेत. शिक्षकांअभावी पासपोली शाळा क्र. २ जुलैमध्ये कायमस्वरूपी बंद करण्यात आली. त्यापूर्वी २०१८ मध्ये पासपोली शाळा क्र. ३ बंद झाली होती. दुरुस्ती आणि डागडुजीअभावी खिंडीपाडा शाळेलाही टाळे लागले. गेल्या वर्षात पालिकेच्या एकूण ८ मराठी शाळा बंद झाल्या. परिणामी मराठी शाळांचे भविष्य टांगणीला लागले आहे. गेल्या तीन वर्षांत इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या संख्येत ६ ने भर पडली. मराठी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यासाठी मुंबई शहर व उपनगरातील विविध पक्षांमध्ये कार्यरत असणारे मराठी राजकीय घटकही उदासीनता दाखवत आहेत. या उदासीनतेमुळेच मुंबई महापालिका क्षेत्रातील मराठी शाळांना घरघर लागली असून शाळांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे चित्र कायम राहिल्यास सर्वच मराठी शाळांना कायमचेच टाळे लागण्याची भीती आहे.

शिक्षकांची अपुरी संख्या

अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांना अध्यापनात अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे अनेक शाळांमध्ये तीन ते चार इयत्तांमधील विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसवून शिकवण्याची नामुष्की पालिकेच्या शिक्षण विभागावर ओढवली आहे. शिक्षक भरतीची प्रक्रिया रखडल्यामुळे उपलब्ध शिक्षकांवर प्रचंड ताण येत असून शिक्षकांअभावी शाळा बंद पडल्याची उदाहरणे यापूर्वी मुंबईत घडली आहेत. दरम्यान, वर्ष २०२१ – २२ मध्ये पालिकेच्या शिक्षण विभागात एकूण ९७५५ शिक्षक होते. त्यात घट होऊन २०२४ – २५ मध्ये सेवेत ८६३० शिक्षक आहेत.

समायोजनात नियोजन नाही

शाळा बंद पडल्यानंतर किंवा शाळेचे पाडकाम केल्यांनतर तेथील विद्यार्थ्यांचे अन्य शाळांमध्ये समायोजन केले जाते. घरापासून १ किलोमीटरच्या परिघात शाळा असावी, असा नियम असतानाही विद्यार्थ्यांना दूरपर्यंत पायपीट करावी लागते. मोरी रोड शाळा, न्यू माहीम शाळेतील विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले असून विद्यार्थ्यांना दूरच्या शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. विद्यार्थ्यांना धारावीतून कापड बाजार येथील पालिकेच्या शाळेतील येण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे ते १ तास पायी चालावे लागते. चेंबूरनाका येथेही अशीच स्थिती आहे.

विद्यार्थी संख्येत वाढ

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या निकालाचा आलेख, व शैक्षणिक गुणवत्तेमुळे विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. वर्ष २१-२२ मध्ये पालिका शाळेत २ लाख ९२ हजार ८२५ विद्यार्थी शिक्षण घेत होते. पालिका शाळांमध्ये २३-२४ मध्ये ३ लाख २८ हजार ६०२ विद्यार्थी, २४-२५ मध्ये ३ लाख १० हजार ४२६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

Comments
Add Comment