Friday, December 26, 2025

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

१६ जानेवारीला मुंबई जिंका;  अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार प्रत्यक्षात साकार करण्यासाठी महायुती पुन्हा मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करेल. येत्या १६ जानेवारीला मुंबई जिंकून अटलजींना खरी आदरांजली अर्पण करूया”, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील कार्यकर्त्यांना केले.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त भाजपच्या मुंबई कार्यालयात 'चित्र-चरित्र प्रदर्शनी'चे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय सहसंगठन महामंत्री शिवप्रकाश, मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, "आम्ही अटल सेतूची (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) निर्मिती केली, तरीही अटलजींच्या स्मृतींना साजेसे भव्य स्मारक मुंबईत उभारले जावे, ही सामूहिक भावना आहे. हे स्मारक निश्चितच येत्या काळात साकार होईल. अटलजींनी सुरू केलेल्या कार्याची प्रेरणा जपत, मुंबई महानगरपालिकेत पुन्हा एकदा महायुतीची सत्ता प्रस्थापित करून पारदर्शकता आणि प्रामाणिकतेच्या मूल्यांवर आधारित कारभार रुजवला जाईल. ही निवडणूक पारदर्शक प्रशासन आणि विकासाच्या उद्देशाने लढली जात आहे. आज अटलजींना श्रद्धांजली अर्पण करतो, मात्र खरी श्रद्धांजली १६ जानेवारीला महायुतीचा भगवा महानगरपालिकेवर फडकल्यावर अर्पण होईल."

मुख्यमंत्री म्हणाले, भारत मातेचे सुपुत्र भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी जवळजवळ पाच दशकांहून अधिक काळ देशाला दिशा दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घडवलेल्या नवभारताचा पाया खऱ्या अर्थाने अटलजींनी रचला. परराष्ट्रमंत्री असताना त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला नवी दिशा दिली, ज्याच्या तत्त्वांवर आजही भारताचे धोरण आकारले जाते. अटलजी म्हणायचे की, देशाच्या एकता आणि एकात्मतेचा आविष्कार रस्त्यांच्या माध्यमातून होतो. त्यासाठी त्यांनी 'प्रधानमंत्री ग्राम सडक योजना' सुरू करून उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम भारत जोडला. जागतिक दर्जाच्या महामार्गांची संकल्पना ही अटलजींच्या दूरदृष्टीची साक्ष आहे.

अटलजींमुळे भारतीय भाषांना जागतिक मान्यता

पोखरण अणुचाचणीनंतर जगाने भारतावर लादलेल्या निर्बंधांनंतरही अटलजींनी ठामपणे देशाची अर्थव्यवस्था सक्षम केली. संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करणारे ते पहिले पंतप्रधान होते, ज्यामुळे भारतीय भाषांना जागतिक मान्यता मिळाली. अटलजी अनेक भाषांमध्ये प्रवीण होते आणि साहित्याचा त्यांना सखोल अभ्यास होता. हिंदुत्वाची व्यापक व्याख्या करणारे आणि राष्ट्रभक्तीची जाज्वल्य भावना प्रकट करणारे ते नेते होते. अटलजींनी दाखवलेला मार्ग, दिलेले विचार, दृढता आणि राष्ट्रवाद आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे नेत आहेत. त्यामुळेच भारत आज जगातील प्रमुख शक्ती म्हणून उभा राहिला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा